(नंदिवडे / वार्ताहर)
२६ जानेवारीच्या ग्रामसभेला ग्रुप ग्रामपंचाय नांदिवडे मध्ये लोकवस्तीतून गॅस टर्मिनल प्रकल्प स्थलांतर व्हावा, म्हणून सभागृहामध्ये जनसागर लोटला होता. कार्यक्षेत्रालील अनेक लोक या सभेला उपस्थित होते.
नांदिवडे गावात अवघ्या १०० ते २५० मीटर अंतरावर वाडीवस्त्यांच्या मध्ये जिंदाल कंपनी गॅस टर्मिनल उभारत आहे. तसेच आजूबाजूला काही अंतरावर संदखोल, सांडेलावगण, जयगड, साखरमोहल्ला, कचरे, चाफेरी ही मोठी गावे आहेत. आधीच राखेच्या व कोळश्याच्या धुळीने विविध आजाराने ग्रस्त असलेला नांदिवडे गाव व परिसर त्यात गॅस टर्मिनल प्रकल्प आणखी म्हणजे आणखी महाभयानक संकट आहे.
१२ डिसेंबर २०२४ रोजी गॅस वायू गळतीमुळे शाळेतील सुमारे १०० विद्यार्थी बाधित झाले होते. भोपाळ गॅस वायू गळती प्रकरण तसेच जगभरातील अनेक बातम्या पाहता लोकांनी एकमताने गॅस टर्मिनल प्रकल्प लोकवस्तीतून स्थलांतर करावा, असा ठराव एकमताने करण्यात आला. तसेच जागेवर सुरु असलेले कामही त्वरित बंद करावे असाही ठराव करण्यात आला. जनसुनावणी न घेता प्रशासनाने कोणत्या निकषवर या प्रकल्पला परवानगी दिली, असा प्रश्नही लोकांनी उपस्थित केला. तरी याची प्रशासनाने दखल घ्यावी व जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.