(नवी दिल्ली)
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ जुलैपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने २६ जून २०२३ पर्यंत उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची शेवटची संधी दिली होती.
आता जास्त पेन्शन मिळवण्यासाठी सभासदांना ११ जुलैपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. मात्र उच्च पेन्शन योजना प्रत्येक सदस्यासाठी नाही. सर्वोच्च न्यायालयाने ४ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार, ईपीएफचे काही सदस्यच उच्च पेन्शनसाठी अर्ज करू शकतात. उच्च पेन्शनसाठी पात्र लोकांनी लवकरात लवकर अर्ज करावा, अन्यथा शेवटची तारीख संपल्यानंतर तुम्हाला जास्त पेन्शन मिळण्यास तुम्ही पात्र राहणार नाही, असे आवाहन ईपीएफओने केले आहे. दरम्यान ईपीएफओने यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ दिली आहे.
वास्तविक यूजर्स उच्च पेन्शनचा पर्याय निवडीसाठी ईपीएफओकडे अनेकदा डेडलाईन वाढवून मागितली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर सदस्यांना पर्याय निवडीसाठी ४ महिन्यांची मुदत दिली होती. त्यानंतर जास्त पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी सुविधा ३ मे पर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा आजपर्यंत म्हणजे २६ जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. त्यात नुकतीच ईपीएफओने अधिक सवलत देत जास्त पेन्शनच्या अर्जाची मुदत पुन्हा एकदा ११ जूलैपर्यंत वाढवून दिली आहे.