(चिपळूण)
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू.इंग्लिश स्कूल व ज्यूनि. कॉलेज खेर्डी चिंचघरी (सती) या विद्यालयांमध्ये इंग्रजी स्पिकिंग कोर्स उपक्रमाबाबत पालक सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर यांनी इंग्रजी भाषेचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व विशद केले. तसेच विद्यार्थ्यांनी इंग्रजी संभाषण कला अवगत करणे ही काळाची गरज आहे असे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी या विषयाबद्दल आवड निर्माण व्हावी तसेच त्यांची इंग्रजी वक्तृत्व सुधारावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे असे सांगितले.
शिक्षक मनोगतामध्ये विद्यालयातील इंग्रजी शिक्षक श्री.मिलिंद यादव यांनी विद्यालयातील या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे सांगितले. विद्यालयातील इंग्रजी शिक्षक श्री.सतीश पालकर यांनी इंग्रजी स्पिकिंग कोर्सची संपूर्ण माहिती पालकांना दिली.तसेच या कोर्समध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध ऍक्टिव्हिटींची ही माहिती दिली.हा कोर्स विद्यार्थ्यांसाठी कसा उपयुक्त आहे असे सांगितले.
या सभेमध्ये मागील वर्षातील इंग्लिश स्पीकिंग कोर्स मध्ये शिकलेल्या विद्यार्थिनी कु.सायली जाधव, कु.अवंती इचले,कु.सृष्टी पंडव यांनी या कोर्स बद्दल आपला अनुभव पालकांना सांगितला.तसेच हा कोर्स त्यांच्यासाठी खुप फायदेशीर झाल्याचे सांगितले. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी इंग्रजी अत्यंत आवश्यक आहे.हे सांगताना शाळेच्या या अनोख्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
या पालक सभेला मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर, इंग्रजी शिक्षक श्री.सतीश पालकर, श्री. शशांक हळबे, श्री.मिलिंद यादव उपस्थित होते. या संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन इंग्रजीमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी केले. तर आभार श्री.सतीश पालकर यांनी मानले.