(सिंधुदुर्ग)
आजचा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी भावनिक आहे. जिथं राणेसाहेबांची सुरुवात झाली, ज्या चिन्हात, त्या पक्षात माझी सेकंड इनिंग सुरू होतेय. महायुतीनं या जागेवर मला पात्र समजलं, त्याचा आनंद आणि समाधान आहे. मी सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो. दिलेला शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाळतात हे आज दिसून आले, असं सांगत माजी खासदार निलेश राणे यांनी ‘धनुष्यबाण’ उंचावत कुडाळमधून विजयाचा एल्गार केला.
कुडाळ हायस्कूल येथील मैदानावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात व्यासपीठावरील भव्य डिजिटल स्किनवर “नवी दिशा, अध्याय नवा…कुडाळ मालवणला बदल हवा, ठेवुनी हिंदुत्वाची जाण.. पुन्हा एकदा धनुष्यबाण…” अशा आशयाची लक्षवेधी टॅग लाईन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.
आजचा दिवस शिवसेना आणि कोकणवासियांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे, माजी खासदार निलेश राणे हे स्वगृही परतले आहेत. निलेश राणे यांनी हातात धनुष्यबाण घेतला, ही एक प्रकारे घरवापसी आहे. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा विजय झाला. ही एक झाकी है, अब शिवसेना बाकी है..! असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे मी तुमच्या कायम पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास दिला.
शिवसेना भाजपा वेगळं नाही, दिवाळीत फटाके फोडाल पण 23 तारखेला निलेश राणे यांच्या विजयासाठी फटाके फोडायला मी स्वतः येणार आहे. नारायण राणे यांनी ज्या पक्षातून सुरुवात केली त्या पक्षात निलेश राणे आले आहेत. धनुष्यबाण कोकण सुपुत्राच्या हातात शोभून दिसतो. निलेश राणे यांच्या प्रवेशाने महायुतीला मोठ बळ मिळाले आहे. महाविकास आघाडी सरकार असताना सर्वच कामाना स्थगिती होती. मी धाडस करून महायुतीच सरकार आणले. बाळासाहेबांच्या विचारासाठी ज्यांनी सत्तेवर लाथ मारली, काँग्रेसमोर ज्यांनी घुडगे टेकले त्यांना कायम विरोधी पक्षात ठेवण्यासाठी निलेश राणे शिवसेनेत आले आहेत, मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो असे शिंदे म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी निलेश यांच्या शिवसेना प्रवेशासाठी तयारी दर्शवल्याबद्दल खासदार नारायण राणे यांचे आभार मानले. तसेच निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे महायुती तळ कोकणात अधिक भक्कम झाली. नारायण राणे यांनी स्वतः ज्या शिवसेनेमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली त्याच शिवसेनेमध्ये आज त्यांचे पुत्र निलेश राणे पुन्हा प्रवेश घेत असल्याने एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. लोकसभा निवडणुकीत याच कुडाळ शहराने नारायण राणे साहेबाना २६ हजारांचे मताधिक्य मिळवून दिले होते. मात्र आजची ही गर्दी पाहता येत्या विधानसभेत हेच मताधिक्य ५२ हजार झाल्याशिवाय राहणार नाही,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असून गेल्या दोन वर्षात त्यांना न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो, लेक लाडकी लखपती योजना असो, महिलांना एस टी मध्ये 50 टक्के सवलत असो किंवा शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या अनेक योजना असो, त्यातून सर्व वर्गांना सक्षम करण्याचा प्रयत्न केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक, आ.नितेश राणे, उद्योजक भैय्या सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक रूपेश पावसकर, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा कुडाळकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आदी शिवसेना भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.