(संगमेश्वर / एजाज पटेल)
महागाई दिवसेंदिवस गगनाला भिडत चालली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. जीवनावश्यक सर्वच वस्तूंवर महागाईच्या झळा बसत आहेत. यातून अंडी तरी कशी चुकणार, थंडीचा जोर पाहून अंडीही भाव खात आहेत. तरीही अंडी खाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळेच की काय? मागणी वाढल्यामुळे थंडीच्या दिवसात अंड्याचे भाव सुद्धा गगनाला भिडले आहेत.
काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात 6 रुपयाला एक तर 72 रुपये डझनाने मिळणारी अंडी आता 8 रुपयाला एक तर 96 रुपये डझनाप्रमाणे विकली जात आहेत. भाववाढ झाली असली, तरी अंडी खाणारे शौकीन मोठ्या प्रमाणात अंडी खरेदी करत असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे. अंड्यांच्या किमतीत हिवाळ्यापूर्वीच यंदा एक रुपयाने वाढ झाली होती. गेल्या वर्षी पाच ते सहा रुपये नग मिळणारे अंडे गेल्या महिन्यात सात रुपयांना मिळत होते. आता हेच अंडे आठ रुपयांना झाले आहे. कोंबड्यांचे खाद्य महागल्याने देखील अंड्याचे भाव वाढले आहेत. अजून किमान अडीच महिने ही दरवाढ राहील.
कडाक्याच्या थंडीमुळे मागणीत वाढ
मागणी वाढण्याचे कारण अंडी ही उष्ण असतात. त्यामुळे शरीराला उष्णता मिळावी, यासाठी हिवाळ्यात प्राधान्याने अंड्यांचे सेवन केले जाते. त्यामुळे थंडीच्या हंगामात सर्रास अंड्यांच्या किंमतीत वाढ होते.