(रत्नागिरी)
जागतिक शिक्षण दिनानिमित्त द एज्युकेशन सोसायटी, कडवई यांनी शुक्रवार दि. २४ जानेवारी, २०२५ रोजी आयोजित शैक्षणिक मेळाव्यामध्ये मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यालयाने सहभाग दर्शविला व विद्यार्थ्यांना मत्स्य शस्त्राबद्दल शैक्षणिक जागरूकता आणि व्यवसायाचे मार्गदर्शन व समुपदेशन केले.
सदर मेळाव्याचा उद्देश हा प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रिडा कृषी, वैद्यकीय, पर्यटन, साहित्य, इंजीनियरिंग, विविध व्यवसायीक व रोजगार संधी उपलब्ध करून देणाऱ्या शैक्षणिक संस्थाची माहिती देणे हा होता. मेळाव्यामध्ये विविध विद्यालयातील साधारणत: ५०० सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी माहिती केंद्राला भेट दिली.
या मेळाव्यामध्ये मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातर्फे श्री. सुशिल कांबळे, श्री. तौसिफ काझी, श्री. श्रीराम शिंदे, श्री. रविशेखर सावंत यांनी मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रमात शिकविले जाणारे विविध विषय व इतर उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधी अशा वेगवेगळ्या स्वरुपाची माहिती, माहिती पत्रक, व सादरीकरण यांच्या माध्यमातून समजावून सांगितली. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील विविध अधिकारी कर्मचारी तसेच शैक्षणिक संस्थाचे विविध शाळांतून उपस्थित असलेले शिक्षक व अधिकारी यांनीही माहिती केंद्राला भेट देऊन या मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाबाबतची माहिती जाणून घेतली व विद्यार्थ्यांना भविष्यातील संधीबाबत चर्चा केली.
येत्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून या अभ्यासक्रमामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अमलबजावणी सुरू होणार असून त्यामध्ये मत्स्य शास्त्रासंबंधी विविध कौशल्य विकासाच्या विषयांचा अंतर्भाव होणार असल्याचेही सांगण्यात आले. माहिती केंद्राला भेट दिलेल्या सर्व मान्यवरांना श्री. सुशिल कांबळे व श्री. तौसिफ काझी यांनी आवश्यक ती माहिती दिली.
सदर मेळाव्यामध्ये उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती मिळावी त्यांना मत्स्य क्षेत्रातील विविध अत्याधुनिक ज्ञान अवगत व्हावे या करिता मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते यांचे प्रत्यक्षरीत्या मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यां पर्यंत जास्तित जास्त माहितीची देवाण घेवाण व्हावी याकरिता माहिती पत्रक, सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती प्राप्त होईल यावर विशेष भर दिला. सदर कार्यक्रमातील सहभागासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. सतिश नारखेडे, आणि कृषि तंत्रज्ञान शिक्षण विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ठोकळ यांचे मार्गदर्शन लाभले.