‘मुघल ए आझम’ हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये अक्षरशः खळबळ माजविणारा, अनेक विक्रम करणारा, अनेक दंतकथा आणि घटनांनी भरलेला, खूप गुणी कलावंतांना एकत्र आणणारा, प्रचंड खर्चाचा असा हा अप्रतिम चित्रपट होता.
या चित्रपटाचे निर्माते शापूरजी पालनजी आणि दिग्दर्शक के.असिफ होते. चित्रपटाचे चित्रीकरण इतके खर्चिक होते की निर्मात्याचे दिवाळे वाजते की काय अशी स्थिती अनेकदा निर्माण झाली. या चित्रपटातील युद्धाच्या चित्रीकरणासाठी २००० ऊंट, ४०० घोडे आणि ८००० सैनिकांचा वापर केला गेला होता. जोधाबाईंच्या महालातील कृष्णजन्म सोहोळ्यासाठी श्रीकृष्णाची, खऱ्या सोन्याची मूर्ती वापरली गेली. सव्वातीन तासाच्या चित्रपटात सर्व गाणीच सुमारे १ तासाची होती.
‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी १५० फूट लांब, ८० फूट रुंद आणि ३५ फूट उंच असा खराखुरा शिशमहाल त्यावेळचे दीड कोटी रुपये खर्चून उभारला होता. या चित्रपटाचा शुभारंभ ( प्रिमियर ) ५ ऑगष्ट १९६० रोजी मुंबईतील मराठा मंदिर या चित्रपटगृहात झाला. चित्रपटाची सर्व रिळे हत्तीच्या पाठीवरून चित्रपटगृहात आणण्यात आली. चित्रपटगृहाबाहेर शीशमहालचा सेट आणून पुन्हा उभारण्यात आला होता.
यातील नायिकेचे काम करणारी मधुबाला ही उत्तम नर्तिका होती, पण या नृत्यामधील अनेक पदन्यास तिला जमत नव्हते. ‘प्यार किया तो डरना क्या’ या गीताच्या सुरुवातीलाच असंख्य गिरक्या आहेत. तेथे दिग्दर्शक के.असिफ यांना मधुबालाकडून पाहिजे तसा परिणाम मिळत नव्हता. शेवटी तेथे लक्ष्मी नारायण या पुरुष नर्तकाला मधुबालाच्या वेषभूषेसह नृत्यासाठी तयार केले. त्याला पूर्ण मेकअप करूनही, वेगाने गिरक्या घेतांना लॉंगशॉटमध्ये दिसणारा त्याचा चेहरा असिफ यांना मान्य नव्हता. या चित्रपटाचे अनेक भव्य आणि दिमाखदार सेट्स पुण्याच्या निष्णात शिल्पकार श्री. बी.आर.उर्फ अप्पासाहेब खेडकर यांनी बनविले होते. कला दिग्दर्शक सय्यद काद्री यांनी खेडकर यांना प्रत्यक्ष सेटवर पाचारण केले. हे खेडकर अत्यंत प्रतिभावंत शिल्पकार होते. कुठलेही रीतसर शिक्षण न घेता त्यांनी देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे ९ फुटपासून ते १९ फुटांपर्यंत ३४ अश्वारूढ पुतळे बनविले होते. बाजीराव पेशवे, राणी चैनम्मा, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गगनगिरी महाराज अशा अनेक दिग्गजांचे पुतळे त्यांनी बनविले.
या खेडकरांनी यांनी एक वेगळीच शक्कल लढविली. त्यांनी केवळ फोटोंवरून मधुबालाच्या चेहेऱ्याचा एक हुबेहूब पुतळा तयार केला.
तरीही अचूकतेसाठी प्रत्यक्ष मधुबालाने समोर येऊन बसणे आवश्यक होते. त्यासाठी मधुबालाही तयार झाली. तिला तिचाच हुबेहूब पुतळा पाहून आनंद झाला. नंतर हा पुतळा घेऊन खेडकर त्यांच्या घराजवळच असलेल्या एका रबरी फुग्यांचा कारखान्यात गेले. तेथे विनंती करून त्यांनी या पुतळ्यावर रबराचा जाडसर द्रव ओतून एक सुंदर मुखवटा बनविला. ६० वर्षांपूर्वी आपल्याकडे फारसे तंत्रज्ञान उपलब्ध नसतांना, पुण्यातील या महान शिल्पकाराने भारतातील हा पहिलावहिला मुखवटा बनविला हे विशेष…!
मुघल ए आझम या चित्रपटाला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट आणि ‘प्यार किया तो डरना क्या’ हे त्यातील गीत अजरामर झाले. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशामध्ये श्री. अप्पासाहेब खेडकरांच्या या आगळ्यावेगळ्या आणि खूप महत्वाच्या योगदानाबद्दल त्यांना त्रिवार अभिवादन!