(संगमेश्वर / एजाज पटेल)
सणासुदीला राज्य शासनाकडून देण्यात येणारा आनंदाचा शिधा यावर्षी दसरा गेला आणि दीपावलीचाही सण झाला तरीही राज्यातील गोरगरीब जनता आनंदाच्या शिध्यापासून वंचित राहिली आहे. दसऱ्याला आनंदाचा शिधा दिला गेला नाही. तो दिवाळीत मिळेल, असे सांगितले गेले होते. दसरा सणाला नाही तर दिवाळी सणाला तरी शिधा मिळेल या आशेवर गोरगरीब, सर्वसामान्य जनता असताना या आशेवरही शासनाने पाणी फेरले असल्याचे चित्र आहे, कारण यामुळे काहींची दिवाळी कोरडीच गेली आहे.
राज्य शासनाच्यावतीने राज्यातील मोठे सण उत्सव काळात स्वस्त धान्य दुकानातून पिवळे व केशरी रेशनकार्डचे प्राधान्य कुटुंबांना रेशनकार्डधारकांना शंभर रुपयात गहू, डाळ, तांदूळ, साखर, रवा, मैदा, तेल असे चार ते पाच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात होते. यापैकी गहू व तांदूळ मोफत तर उर्वरित रवा, मैदा, तेल, डाळ यासाठी कार्डधारकांकडून शंभर रुपये घेतली जात होते.
राज्यात लाखो ग्राहकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळते. या धान्याचे अनेक लाभार्थी आहेत; परंतु यावर्षी निवडणूक कालावधीमध्ये दीपावली आल्यामुळे आनंदाच्या शिध्याला आचारसंहितेचा फटका बसला. यावर्षी कार्डधारकांना ऐन दीपावलीत आनंदाच्या शिध्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे रेशनकार्डधारकांच्या आनंदावर आचारसंहितेचे विरजण पडले असेच म्हणावे लागेल.
०१ नोव्हेंबर २०२४ पासून राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वितरण करणार नसल्याचे शासनाला कळवून संप जाहीर केला होता; परंतु विधानसभा निवडणूक व आचारसंहिता असल्याने सरकारला निर्णय घेताना अडचणी निर्माण होणार असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांनी संप मागे घेतला. पण आनंदाचा शिधा न मिळाल्याने सामान्य जनतेमधून नाराजी व्यक्त होत आहे.
राज्य शासनाकडून यावर्षी दसऱ्याच्या सणाला आनंदाचा शिधा दिला जाणार होता; परंतु त्यावेळीही शासनाकडून आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला गेला नाही. दसऱ्याला रद्द झालेला आनंदाचा शिधा दिवाळीला मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु शासनाने त्यावेळीही तो शिधा दिला नाही. दिवाळीला आचारसंहितेचे कारण पुढे करून त्यातूनही ग्राहकांना वंचित ठेवले. त्यामुळे जनतेतून सरकारच्या विरोधात संतापाचे बार फोडले जात आहेत.