(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील विद्यार्थीनी दुर्वा मंगेश गोताड हिने इयत्ता दहावी परीक्षेत विशेष नैपुण्य प्राप्त केल्याबद्दल रत्नागिरी येथील कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा रत्नागिरी, कुणबी समाज कर्मचारी सेवा संघ रत्नागिरी लोकनेते शामरावजी पेजे स्मृती न्यास रत्नागिरी आणि कुणबी समाज क्रांती संस्था रत्नागिरी या संयुक्त संस्थांच्या वतीने रत्नागिरी येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात तिला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी तिन्ही संस्थांच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत तिचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
दुर्वा गोताड हिने मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असताना दहावीच्या परीक्षेत विशेष नैपुण्य प्राप्त करून ८१ टक्के गुण प्राप्त केले. तसेच तिला सर्वच विषयांत अतिशय उल्लेखनीय असे गुण प्राप्त झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. गणपतीपुळे येथील एका गरीब कुटुंबात तिने आपल्या आई-वडिलांचे परिस्थिती गरीबीची असताना देखील आपल्या अभ्यासाच्या जोरावर हे विशेष नैपुण्य प्राप्त केल्याने तिला सन्मानित करण्यात आले आहे.
दुर्वा हिचे वडील मंगेश गोताड हे गणपतीपुळे समुद्रावर फोटोग्राफी व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात, तर आई देखील गणपतीपुळे येथील घरगुती ठिकाणी काम करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचे काम करते. या दोन्ही आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्याचेच फळ त्यांना दुर्वाने मिळवून दिले आहे. दुर्वाच्या या कौतुकास्पद नैपुण्याचे विशेष अभिनंदन होत आहे . तसेच गणपतीपुळे परिसरातील विशेष संस्थांकडून आणि ग्रामस्थ, पालकांकडून खास अभिनंदन होत आहे.