(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई गोवा महामार्गावर कुरधुंडा येथे म्हात्रे कंपनीच्या भरधाव येणाऱ्या डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराला समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना आहे. आज गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. दुचाकीस्वार आकिब इबजी राहणार मजगाव रत्नागिरी यांच्या पायावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे डॉक्टरांच्या सल्ल्याने हलवण्यात आले आहे.
मुंबई गोवा महामार्गावर म्हात्रे कंपनीकडून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. म्हात्रे कंपनीतील डंपर चालकांचा मुजोरपणा दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास संगमेश्वरहून रत्नागिरीच्या दिशेने दुचाकीस्वार (एमएच 08 एई 6941) या दुचाकीवरून राकिब रफिक मुल्ला वय 34 वर्ष राहणार मजगाव रत्नागिरी व आकिब इबजी हे रत्नागिरीच्या दिशेने जात होते. यावेळी संगमेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या म्हात्रे कंपनीच्या (एम एच 46 बी बी 3035) हा डंपर सुसाट वेगात घेऊन येणाऱ्या चालकाचा नियंत्रण सुटल्याने त्याने दुचाकीस्वाराला विरुद्ध दिशेला जाऊन जोरदार ठोकर दिली.
समोरून दुचाकीला धडक दिल्याने डंपरचे चाक दुचाकीस्वाराच्या पायावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यांनी दुचाकीस्वाराला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर संतप्त ग्रामस्थांनी डंपर चालकाला चोप दिला. अपघातानंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या अपघाताची माहिती संगमेश्वर पोलिसांना देण्यात आली आहे.
कोळंबे येथे डंपर खाली चिरडून कुरधुंडा येथील वृध्दाचाही झाला होता मृत्यू
कोळंबे येथील स्टॉपवर रस्त्याबाहेर दुचाकीवर उभ्या असलेल्या स्वाराला म्हात्रे कंपनीच्या डंपर चालकाने चिरडले होते. या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मुजोर डंपर चालक डंपर घेवून फरार झाला आहे. मुजीब जाफर सोलकर (५०, कुरधुंडा, मुस्लीम मोहल्ला संगमेश्वर) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला होता. ग्रामस्थांनी त्यानंतर रास्ता रोको केला होता. संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर पोलिसांच्या मध्यातीनंतर मृतदेह ताब्यात घेतला. हा अपघात 2 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता झाला होता.