(संगमेश्वर /प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदाय आयोजित सकल भक्तीपंथीय संघटनासाठी घेण्यात आलेला ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकीर्तन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येक गावातील वारकरी,भाविक भक्त उपस्थित होते.
सकाळी ठीक नऊ वाजता सर्व ज्येष्ठ वारकऱ्यांच्या हस्ते वीणा पूजन,कलश पूजन व ध्वज पताकारोहन करण्यात आले व्यासपीठ चालक यांनी सुंदर भजनावली घेऊन वारकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमात जास्तीत जास्त महिला व पुरुष तसेच तरुण भक्तगणांनी सहभाग घेतला.
दुपारी महाप्रसाद झाल्यानंतर प्रत्येक गावातील ज्येष्ठ वारकऱ्यांनी सहविचार सभेत आपापली उच्च कोटीची सकारात्मक मते मांडली. ह.भ.प.रमेश महाराज बांडागळे यांनी केलेले प्रवचन हे कार्यक्रमाचे आध्यात्मिक शोभा वाढवणारे होते. ग्रामदेवता वरदान देवी तुरळच्या प्रांगणात ज्ञानेश्वरी हरी पाठाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बाळगोपाळ, आबालवृद्ध, तरुणांसोबतच पावल्या खेळू लागले तेव्हा जणू पर पंढरपुरच अवतरल्यासारखे वाटले.
ह.भ.प. महंत गुरुवर्य अनंत महाराज लिंगायत यांनी अध्यात्मिक आणि परमार्थिक पद्धतीने वारकरी कीर्तन केले त्यांनी ‘नाम’ शब्दाच्या एकजुटीचे महत्त्व सांगितले.महंत ह.भ.प. श्री अनंत महाराज लिंगायत यांनी तुकाराम महाराजांच्या ‘काय सांगू आता संतांचे उपकार’या अभंगाचे निरूपण करताना अध्यात्म म्हणजे काय, परमार्थ मध्ये साधना होणे तसेच अहंकार सोडून वागणे तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील विचारांचे अनुसरण होणे महत्वाचे आहे असे सांगितले.
कीर्तन सोहळ्याला संगमेश्वर तालुक्याचे आमदार माननीय शेखर निकम, वशिष्टी दूध प्रकल्प संचालक संजय यादव,संगमेश्वर पोलीस स्टेशनच्या पीएसआय सुतार मॅडम,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, संतोष थेराडे, माजी आमदार सुभाष बने यांनी कार्यक्रमाला भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार श्री विनायक राऊत यांनी सर्वांचे व कार्यक्रमाचे कौतुक केले.
नाम नामसंकीर्तन सोहळ्यात संगमेश्वर तालुक्यातील उद्योगमुख गायक, तरुण वादक, टाळकरी व विशेष म्हणजे मुली व महिलांनी विशेष सहभाग दर्शविला. संगमेश्वर तालुक्याचा एक दिवसाचा हरिनाम कार्यक्रम नियोजनबद्ध व भक्तिमय वातावरणात रंगला होता,यामागे सर्व गावा-गावातील आबालवृद्ध व वारकऱ्यांनी फार मोठा उत्साह दाखवला. त्यामुळेच कार्यक्रम यशस्वी पार पडला शेवटी ह.भ. प. काजवे महाराज यांनी आनंदाश्रूनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प सुनील करंडे, प्रदीप कानाल, नितीन थेराडे यांनी केले.