( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
शहरातील भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातील गाळाचा उपसा गेल्या कित्येक वर्षांपासून न झाल्याने येथील मच्छीमारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भाट्ये खाडी परिसरातील राजीवडा, कर्ला, भाट्ये आणि फणसोप परिसरातील मच्छीमारांच्या नौकांना धोका निर्माण झाला आहे.
भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदराच्या मुखाशी साचलेला गाळ काढण्यासाठी गेली अनेक वर्षे मच्छीमारांचा संघर्ष सुरू आहे. या गाळामुळे समुद्रात ये-जा करण्याचा मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहे. राजीवडा, कर्ला, भाट्ये आणि फणसोप या गावांतील मच्छीमारांचा समुद्रात मासेमारीसाठी ये-जा करण्याचा मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे. मात्र, या मार्गातील गाळाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मांडवी बंदरातील गाळ उपसा न झाल्याने अनेकदा नौकांना अपघात होऊन बुडाल्याने काही मच्छीमारांना जीव गमवावे लागले आहेत.
राजीवडा येथील जमातुल मुस्लिमीन राजीवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीने मांडवी बंदरातील गाळ काढण्याच्या मागणीसाठी लढा सुरू केला आहे. त्यासाठी शासनाचे उंबरठेही झिजवत आहेत. समितीने उपोषणाचा मार्गही अवलंबला होता. जनता दरबारातही गाळाचा प्रश्न मांडण्यात आला होता. मात्र, आतापर्यंत शासनाकडून तेथील वाळूचा एक कणही काढण्यात आलेला नाही. त्यामुळे भाट्ये खाडी परिसरातील मच्छीमार अडचणीत आले आहेत.
या भागातील गाळ वेळीच न काढल्यास मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांचा मार्गच बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे या भागातील मासेमारीच संपुष्टात येणार आहे.