(फुणगूस / वार्ताहर)
मुबंई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईल तेव्हा जाईल, मात्र तो पर्यंत जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर आजपर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडून अनेकांना नाहक जीव गमवावा लागला. तर काहींना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे. रखडलेल्या महामार्गाचे काम लवकरच पूर्णत्वास तसेच रस्त्यावर ठिकाठिकाणचे अपघाताला निमंत्रण देणारे अडथळे दूर करण्यासाठी जनतेने राज्य तसेच केंद्र सरकारचे दरवाजे ठोठावण्यापासून ते थेट ऊन आणि पावसाची तमा न करता रस्त्यावर उतरून आंदोलनासारखे हत्त्यार सुद्धा उपसले, मात्र घशाला कोरड पडेपर्यंत शासन, प्रशासन तसेच ठेकेदाराला जागृत करण्यासाठी ओरड करणाऱ्या जनतेला आज पर्यंत आश्वासनाचीच खैरात पदरात घेऊन माघार घ्यावे लागले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण आजही पूर्ण न झालेला महामार्ग ठिकठिकाणी असलेले समस्यांचे डोंगर त्यामुळे जनतेचे होणारे हाल चुकलेले नसून दिवसांगणिक वाढत जाणाऱ्या समस्यांचे ग्रहण सुटता सुटत नसल्याने जनतेला मात्र त्याचे नाहक भोग आजही भोगावे लागत आहेत.
आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मान्सूनची केव्हा दमदार हजेरी होईल हे सांगता येत नाही. मात्र मान्सूनपूर्व अवकाळीने अधूनमधून हलक्या स्वरूपात तसेच जोरदारपणे हजेरी लावली असून अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे महामार्गवर अनेक ठिकाणी रस्त्यावर माती आली. तसेच काही ठिकाणी काम न झालेल्या ठिकाणी रस्त्यावर तर काही ठिकाणी असलेल्या खड्ड्यात पाणी जमा झाल्याने त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत तेही जीव मुठीत घेऊन करावी लागली. बावनदी तळेकांटे ते आरवली दरम्यान पर्यंतच्या ठिकाणी ह्या समस्या अधिक प्रमाणात भेडसावत आहेत.
संगमेश्वरसह तालुकातील गावात अवकाळीने मेघगर्जनेसह चांगलेच थैमान घातले. मात्र यावेळी याचा जास्त फटका शास्त्रीपुल मार्गे मुबंई तसेच गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना बसला आहे. या ठिकाणी महामार्गांवर असताव्यस्त आकारासारखा असणाऱ्या अमिबा या जलचर प्राणी च्या आकारासारख्या येथे असणाऱ्या खड्ड्यात पाणी जमा झाल्याने हा राष्ट्रीय महामार्ग कि पाण्याचं तळं असे स्वरूप या महामार्गाचे झाल्याने या खड्ड्यात गाड्या आपटून व खड्ड्यातील माती मिश्रित उडणारे पाणी अंगावर घेऊन पुढे जावे लागत होते.
पाण्याने भरलेल्या या खड्ड्याचा काही दुचाकीस्वरांना अंदाज न आल्याने किरकोळ अपघाताच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. या भला मोठा अवास्तव खड्ड्यामुळे मोठा अपघात तसेच मनुष्य हानी सुद्धा होईल हे नाकारता येणार नाही. तरी दुर्घटना होण्याची प्रतिक्षा न करता सबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल शास्त्रीपुल येथील तसेच महामार्गवर अन्य ठिकाणी धोक्याचे ठरू पाहणारे खड्डे भरण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.