(दापोली)
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून दापोली शहरात महास्वच्छता अभियानाचे आयोजन रविवार दि. 2 मार्च 2025 रोजी सकाळी ठीक 8. 30 वाजता सुरु करण्यात आले होते. ही स्वच्छता मोहिम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पदमश्री पुरस्कार सम्मानित डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
दापोलीतील महास्वच्छता अभियानाचा प्रारंभ सकाळी ठीक 8.30 वाजता केळसकर नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. ममताताई मोरे, स्वच्छता समितीच्या सभापती जयाताई साळवी पाणी पुरवठा समितीच्या सभापती सौ. प्रितीताई शिर्के व अभियानात सहभाग घेणारे श्रीसदस्य उपस्थित होते.
या अभियानात दापोलीतील एसटी स्टॅन्ड ते बुरोंडी नाका, केळकर नाका ते आंबा संशोधन केंद्र कोकण कृषि विदयापीठ, तहसिल कार्यालय दापोली परिसर, पंचायत समिती दापोली परिसर व दापोली शहरातील सर्व रस्ते दुतर्फा स्वच्छ करण्यात आले.अभियानात श्रीसदस्यांनी ओला व सुका कचरा एकूण १५ टन संकलीत करून दापोली नगरपंचायतीच्या डंपींग ग्राऊंडमध्ये टाकण्यात आला. जमा केलेला कचरा वाहून नेण्यासाठी १८ वाहनांची सोय करण्यात आली होती. दापोलीतील महास्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी श्रीबैठक जालगाव, श्रीबैठक साखळोली, श्रीबैठक दाभोळ येथील एकूण ५४० श्रीसदस्यांनी सक्रीय सहभाग घेतला.