( संगमेश्वर / प्रतिनिधी )
रत्नागिरी येथील डॉ. प्रत्युष चौधरी आणि युवा चित्रकार सिद्धांत दीपक चव्हाण यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन डॉ. प्रत्युष चौधरी यांच्या प्रद्योत आर्ट गॅलरीत दि. ५ जानेवारी ते ११ जानेवारीपर्यंत भरविण्यात येत आहे. रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील कलारसिकांनी या प्रदर्शनाला सकाळी ११ ते सायं. ७ वाजेपर्यंत भेट द्यावी, असे आवाहन प्रद्योत आर्ट गॅलरीतर्फे करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कलाकार आणि कला रसिकांसाठी डॉ. प्रत्युष चौधरी यांनी रत्नागिरी येथे प्रज्योत आर्ट गॅलरीची उभारणी केली आहे. जिल्ह्यात अनेक कलाकार आणि शिल्पकार आहेत मात्र त्यांना आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन करण्यासाठी जागेची उपलब्धता नव्हती. कलाकारांची ही अडचण लक्षात घेऊन डॉ. प्रत्युष चौधरी यांनी रत्नागिरी येथे मित्र संकुल, टीआरपी, हॉटेल सावंत पॅलेसच्या समोर प्रद्योत आर्ट गॅलरीची उभारणी केली आहे. या गॅलरीची क्युरेटर म्हणून युवा चित्रकार मयुरी घाणेकर-भाटकर ही काम पाहत आहे. तसेच सिद्धांत चव्हाण हा या गॅलरीचा चित्रकार म्हणून सध्या काम करत आहे.
सिद्धांत याचे कलाशिक्षण देवरुख कला महाविद्यालयामध्ये संपन्न झाले. त्याने बॅचलर ऑफ फाईन आर्टची पदवी प्राप्त केली आहे. सिद्धांतने यापूर्वी रत्नागिरी आणि मुंबई येथील कला प्रदर्शनात ग्रुप शो मध्ये सहभाग घेतला होता. तसेच त्याने डिसेंबर २०२३ रोजी आर्ट प्लाझा प्रदर्शन केले होते. मे २०२४ मध्ये प्रद्योत आर्ट गॅलरीमध्ये सिद्धांत ने प्रदर्शन भरवले आणि डिसेंबर २०२४ मध्ये मुंबईमधील आर्ट एनट्रान्स गॅलरी मध्ये ‘आकृतीबंध’ ग्रुप शोमध्ये सहभागी होता. डॉ. प्रत्युष चौधरी यांनी २०२४ मध्ये प्रद्योत आर्ट गॅरीमध्ये ग्रुप शोमध्ये सहभग दर्शवला होता.
या प्रदर्शनामध्ये अब्स्ट्रॅक्टिव रिअलिझम या शैलीत मूर्त व अमूर्त या संकल्पनांचा मिलाप होतो. कलाकार आपल्या अमूर्त अशा जाणीव, भाव-भावना, विचार, संकल्पना यांना मूर्त आकारांच्या सहाय्याने रूपाकार देतो. अशा तऱ्हेच्या प्रयोगातून चित्रकलेला एक नवा आयाम प्राप्त झाला आहे. अशी कलाकृती प्रेक्षकांसाठी जणू प्रतिबिंबच बनून स्वतःमध्ये डोकावून पहायला प्रोत्साहन देते.
हे कला प्रदर्शन ५ जानेवारी पासून सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कलारसिकांना पाहण्याची संधी असून यावेळी आवडणाऱ्या कलाकृती कलारसिक खरेदी करू शकणार आहेत. या कला प्रदर्शनाला कलारसिकांनी, रत्नागिरीतील नागरिकांनी, कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन डॉ.प्रत्युष चौधरी, चित्रकार सिद्धांत चव्हाण आणि प्रद्योत आर्ट गॅलरीची क्युरेटर युवा चित्रकार मयुरी घाणेकर-भाटकर यांनी केले आहे.