(गुहागर)
“अब की बार चारशे पार’चा नारा देत चारशेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरु आहे. सर्व जागा जिंकून आपल्यासमोर बोलण्यासाठी एकही विरोधक ठेवायचा नाही हीच भूमिका त्यांची असून संख्येच्या बळावर घटना बदलायची आणि देशात हुकुमशाही आणायची असा डाव भाजपचा असल्याची टिका माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथे ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा पार पडला.
यावेळी माजी पालकमंत्री अनिल परब, माजी खा. अनंत गीते, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख सचिन बाईत, चिपळूण तालुकाप्रमुख संदीप सावंत, माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, गुहागर राष्ट्रवादीचे पद्माकर आरेकर, महेश नाटेकर, प्रवीण ओक, नेत्रा ठाकूर, अरुणा आंब्रे, संजय पवार, अनंत चव्हाण, साबीरभाई साल्हे यांच्यासह शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते.
ठाकरे यांनी सध्या देशात चाललेले व्देषाचे राजकारण, तपास यंत्रणांकडून विरोधकांच्या चौकशा लावून त्यांचा आवाज दाबणे, विकास कामांचा निधी अडवणे असे प्रकार होत असल्याचे स्पष्ट केले. मोदी सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी अनेक योजना सुरु केल्या. मात्र, आता एक नवीनच योजना सुरु केली आहे ती म्हणजे भ्रष्टाचारी अभय योजना. भ्रष्टाचारी नेत्यांवर यांनीच आरोप करायचे, चौकशा लावायच्या आणि आपल्या पक्षात घेऊन त्यांना अभय द्यायचे अशी ही योजना असून हीच मोदींची गॅरंटी असल्याची टीका ठाकरे यांनी केली.
निवडणूक आयोग केंद्र सरकारची धुणीभांडी करत आहे. मुंबईसह स्थानिक संस्थांच्या निवडणुका अडवून ठेवल्या आहेत. आता न्यायालयांचे न्यामूर्तीही आपल्या ताब्यात घेण्याचा यांचा प्रयत्न सुरु काही चांगल्या न्यायमूर्तीमुळे त्यांचा निभाव लागत नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्यातील सर्व उद्योग गुजरातला न्यायचे आणि आता तर गुजरातच्या बोटी कोकणच्या समुद्रात येऊन मासे पळवून नेत आहेत. येथील मंजूर झालेली एमआयडीसीही रद्द केली. आम्ही मंजूर केलेला निधी हे विकासकामासाठी वापरत आहेत आणि स्वतःच्या योजना सांगत आहेत. ज्या शिवसेनेने यांना आमदारकी, मंत्रिपदे दिली. यांचे कुटुंब सावरले आणि हेच गद्दारी करुन पक्ष सोडून निघून गेले. हे खोकेदारी असून यांचा पैसा या निवडणुकांमध्ये वापरला जाईल मात्र, यांच्यावर विश्वास ठेऊ नका.
भास्कर जाधव निर्धास्त रहा; शिवसेना तुमच्या पाठीशी आहे
भाजपच्या संस्कृतीबद्दल बोलताना ते म्हणाले, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये यांचे नेते घडविले जातात. सभ्यता व संस्कृती सांगतात. मात्र, यांचे काही नेते असभ्य, अश्लील भाषा वापरुन जाहीर सभांमधून संस्कृतीचे प्रदर्शन मांडतात. अटलजी व अडवाणींचा पक्ष आता राहिलेला नाही असे स्पष्ट करुन भाजपचे गेल्या १० वर्षातील हे राजकारण घाणेरडे असल्याचा आरोप त्यांनी केला. गुहागरच्या जनतेने आजपर्यंत माझ्यावर, शिवसेनेवर विश्वास दाखविला आहे. भास्कर जाधव तुम्ही निर्धास्त राहा. संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. या सभेतील जनसमुदाय पाहून मला पुन्हा प्रचाराला येण्याची गरज नाही, तुम्ही हा किल्ला लढवून विजयी व्हाल यावर माझा तुमच्यावर विश्वास असून मी विजयी मिरवणुकीलाच गुहागरमध्ये येईल, असे शेवटी जाहीर केले.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1