( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरी कार्यालयाच्या मागील बाजूस थिबा राजा कालीन बुध्द मूर्ती आहे. त्या जागेत कम्युनिटी सेंटर विकसित करण्याकरीता प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. तेथील बुद्धाची मूर्ती स्थलांतरित करण्याबाबत नगर परिषदेकडून एका ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना २४ डिसेंबरला चर्चा करण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र नगर परिषद प्रशासनाबरोबर २४ डिसेंबरला होणाऱ्या चर्चेआधीच बौद्ध समाजाकडून मूर्ती स्थलांतरित करण्यास तीव्र विरोध दर्शवला जात आहे. याबाबत बौद्ध समाजाचा रोष पाहून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी, दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देखील सादर केले आहे.
सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बौध्द समाजातील तमाम बौध्द अनुयायी निर्णयापर्यंत येत आहोत की, थिबा कालीन ‘बुध्द मुर्ती’ डि.एस.पी. बंगल्याच्या येथे आहे ती ‘बुध्द मुर्ती’ हलवण्यासंदर्भात निर्णय घेण्याच्या आपल्या हालचाली निदर्शनात येत आहेत. “थिबा राजा कालीन बुध्द विहार स्थळ” या ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या हालचाली चालल्या असल्यास ती ट्रस्ट म्हणजे समाज नव्हे हे सुध्दा आपणास निदर्शनास आणून देत आहोत. त्यामुळे तेथील ‘बुध्दमुर्ती’ला आपल्या माध्यमातून अन्य ठिकाणी हलवू नये अन्यथा बौध्द अनुयायांच्या वतीने उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सुध्दा आपणास देत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जागेमध्ये अन्य कोणतेही बांधकाम करु नये…
यापुढे “थिबा राजा कालीन बुध्द मुर्ती येथील बुध्द विहारासाठी जागा दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्दमहासभा यांनी सन २००८ पासून ह्या जागेची मागणी बोध्द समाजाच्या ताब्यात मिळणेबाबत आज तागायत करणेत आलेली आहे. ती जागा समाजाच्या ताब्यात मिळावी अशी समाजातील सर्व स्तरावरील बौद्ध बांधवांनी योग्य तो पाठपुरावा मागणीकामी चालू आहे. तसेच या साऱ्या गोष्टींचे निरसन होईपर्यंत नवीन जागेत बुध्द मूर्ती हलवू नये तसेच विहाराच्या बुध्दमूर्तीच्या जागेमध्ये अन्य कोणतेही बांधकाम करु नये अशी देखील मागणी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एल. वी. पवार, महाराष्ट्र प्रदेश सचिव दिपक जाधव , जिल्हाध्यक्ष (मिराताई गट) अनंत सावंत, जिल्हा महासचिव बी के कांबळे , केतन पवार, राजन जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.