(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. घनकचरा प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीने जमिनीची केलेली मागणी अद्याप मार्गी लागलेली नाही. त्यामुळे आता ग्रामस्थांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
कुवारबाव ग्रामपंचायतीने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिनांक २५ मार्च २०२३ रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकामागील उपलब्ध असलेल्या सुमारे ८० गुंठे जमिनीपैकी काही जमीन या घनकचरा प्रकल्पासाठी मिळावी अशी एका प्रस्तावाद्वारे मागणी केलेली आहे. मात्र, एक वर्ष होऊन गेले तरी जिल्हाधिकाऱ्यांकडून हा प्रस्ताव मंजूर होऊन आलेला नाही अथवा त्या प्रस्तावाचे काय झाले हेही कळविले जात नाही. पालकमंत्र्यांनी घंटागाडी घ्या आणि कचरा उचला, अशा वारंवार सूचना दिल्या आहेत. मात्र, उचललेला कचरा घनकचरा प्रकल्प नसल्याने टाकणार कोठे, हा प्रश्न काही सुटलेला नाही. मध्यंतरी घंटागाडीत घेऊन कुवारबाव येथील कचरा नाचणे ग्रामपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पात नेऊन टाकावा, असे पालकमंत्र्यांनी सूचित केले होते. मात्र, प्रत्यक्षात नाचणे ग्रामपंचायतीने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कुवारबावचा घनकचरा निर्मूलन प्रकल्प जागेअभावी मार्गी लागू शकलेला नाही.
जागा नाही म्हणून घनकचरा प्रकल्प होऊ शकत नाही. सध्या स्थानिक रहिवासी आणि व्यापारी पत्रकार कॉलनी जवळील नाल्यांमध्ये संपूर्ण गावचा कचरा आणून टाकत आहेत. ग्रामपंचायतीने येथे कचरा टाकू नये, असा सूचना फलक लावला असला तरी त्याची दखल न घेता उघड्यावर कचरा आणून टाकत आहेत. परिणामी या भागात कचऱ्यामुळे दुर्गंधी वाढली आहे. यासंदर्भात कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे घनकचरा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ठराव करून ग्रामपंचायतीला दिला आहे.
मात्र, सातत्याने प्रयत्न करूनही रौप्यमहोत्सवी वाटचाल करणाऱ्या कुवारबाव ग्रामपंचायतीचा घनकचरा निर्मूलन प्रकल्प रखडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.