( रत्नागिरी /प्रतिनिधी )
जिल्हा रुग्णालयात अंदाजे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून इमारतीच्या डागडुजीचे काम, कलर करणे अशी विविध कामे हाती घेण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ जगताप यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर रुग्णालय सुधारण्याकडे लक्षकेंद्रित केले आहे. मात्र यातच आता रुग्णालयातील एक एक प्रकार समोर येत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना असणारे प्रतिक्षालय कक्ष (वेटींग रूम) बंद असल्याने गैरसोय निर्माण होत आहे.
यापूर्वी या शासकीय रुग्णालयातील ढिसाळ कारभाराचे एक एक किस्से जगजाहिर होत होते. मात्र आता रुग्णालयाला नवे जिल्हा शल्य चिकित्सक मिळाल्याने ढिसाळ कारभारात सुधारणा होत आहेत. रूग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दोन प्रतीक्षालय कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. मात्र ते बंद अवस्थेत असल्याने नातेवाईकांना आराम किंवा बसण्यासाठी बाहेरील आंब्याच्या झाडाचा आसरा घ्यावा लागत आहे. तसेच काही नातेवाईक वॉडच्या बाहेर खाली लादिवर बसून दिवस काढावे लागत आहेत. परंतु नातेवाईकांसाठी तयार करण्यात आलेल्या जिन्याच्या दोन्ही बाजूच्या प्रतीक्षालय कक्षाला साखळीचे कुलूप लावल्याचे पाहायला मिळत आहे.
रूग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला त्याचे नातेवाईक गावं खेड्यासह मुंबईतून येत असतात. मात्र येणाऱ्या नातेवाईकांची गैरसोय रुग्णालय प्रशासन कशी करते याचा दाखला हा म्हणावा लागेल. गेल्या अनेक दिवसांपासून नातेवाईकांसाठी निर्माण केलेली दोन्ही प्रतीक्षालय कक्ष बंद ठेवण्यात आली आहे. एका प्रतिक्षालय कक्षात चक्क सामान भरून ठेवण्यात आले आहे. तर दुसऱ्या प्रतीक्षालय कक्ष बैठक व्यवस्था असून देखील ती खोली कुलुप लावून बंद ठेवण्यात आली आहे. येथील प्रशासन रुग्णांच्या नातेवाईकांचे देणंघेणं आहे की नाही? प्रतीक्षालय कक्ष सामान ठेवण्यासाठी की बसण्यासाठी? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कुलूप लावून बंद असलेली प्रतिक्षालय कक्ष तत्काळ सुरू करावी अशी मागणी आता रुग्णांच्या नातेवाईकांमधून केली जात आहे.