(रत्नागिरी)
जाधव फिटनेस ॲकेडमी सामाजिक जाणीवेतून समाज उपयोगी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. त्यानुसार मान्यवरांच्या हस्ते निराधार बांधवांना दिवाळी फराळ व भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. भविष्यात आठवडा बाजार येथे भव्य स्वरूपात निराधार केंद्र उभे राहत असून इमारत पूर्ण झाल्यावर रत्नागिरी शहरातील भिक मागणाऱ्याना कायद्याचा धाक दाखवून सदर निवारा केंद्रात ठेवले जाणार आहे. त्याठिकाणी त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार रोजगार उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा ॲकेडमीचा प्रयत्न असणार आहे.
शहर स्मार्ट सिटीच्या दृस्तीकोनातून वाटचाल करीत असताना प्रथम शहर भिकारी मुक्त होणे आवश्यक असल्यामुळे त्यानुसार प्रयत्न केला जाणार आहे. निराधार केंद्राच्या ठिकाणी मोफत भोजन व्यवस्था उभारून रत्नागिरीत कोणीही उपाशी राहणार नाही अशी व्यवस्था उभारली जाणार आहे. आता चालू असलेले निवारा केंद्र नगर परिषद मुख्याधिकारी बांबर, इंजिनिअर यतीराज जाधव व निवारा केंद्राचे सर्वेसर्वा संभाजी काटकर उत्तम प्रकारे चालवत आहेत. दिवाळी फराळ व भेट वस्तूंचे वाटप या कार्यक्रमाला सुहास शिंदे, अमिषा शिंदे, कनक पवार व समुध्दी जाधव उपस्थित होते. आपल्या उत्पन्नातील काही भाग समाजासाठी देऊन आपण समाजाचे काही देणे लागतो या ॲकेडमीच्या विचार धारेत आपण सहकार्य होऊ शकतो, असे आवाहन जाधव फिटनेस ॲकेडमी तर्फे हेमंत जाधव यांनी केले आहे.