( संगमेश्वर )
शिक्षण विभाग, पंचायत समिती संगमेश्वर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाककृती स्पर्धा जि. प. शाळा परचुरी नं. ३ येथे पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेत सहभागी झालेल्या १३ संघांमध्ये एकूण २५ अन्नपूर्णांनी सादरीकरण केले; ज्यामध्ये १२० हून अधिक पाककृतींचा समावेश होता.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षण विस्तार अधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवने यांनी सर्व माता पालकांना शुभेच्छा दिल्या. वर्षाचे ३६५ दिवस कोणत्याही सुट्टीची मागणी न करता अविरत आपल्या कुटुंबाला पोषक आहार देणाऱ्या मातांचा गौरव करताना ते म्हणाले “२१ व्या शतकात या माता आपल्या देशाच्या भावी पिढीचे आरोग्य कायम राखत आहेत ही बाब स्पृहणीय आहे. याबाबत आम्ही सदैव कृतज्ञ राहू.”
यानंतर स्पर्धेचे परीक्षण झाले. खाद्य रसिकांनीही अभिनव पदार्थांचा आस्वाद घेत सुगरणींचे कौतुक केले. स्पर्धेचा निकाल जाहीर करताना पुन्हा एकदा सर्व निकषांवर मार्गदर्शन करत परिक्षांनी अंतिम तीन क्रमांक घोषित केले. यामध्ये प्रथम क्रमांक वांद्री कुणबीवाडी, द्वितीय क्रमांक परचुरी नं. १ आणि तृतीय क्रमांक फुणगुस मराठी शाळेला जाहीर झाला.
स्पर्धेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवने, केंद्र प्रमुख श्री. संतोष मोहिते, कुरधुंडा उर्दू केंद्र प्रमुख श्री. चंद्रशेखर जाधव, परचुरी गावच्या सरपंच सौ. शर्वरी वेल्ये, दक्षिण परचुरी ग्रामविकास मंडळाचे सचिव श्री. जगन्नाथ दुदम, परचुरी नं. ३ शाळेच्या मुख्याध्यापक सौ. दीप्ती खातू, श्री. गमरे सर, श्री. घडशी सर, अंगणवाडी सेविका संजीवनी चंदरकर, मदतनीस सुहासिनी मेस्त्री, विविध शाळांचे शिक्षक प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.