( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असून, प्रत्येक पक्षाने मतदार संघात तयारी सुरु केली आहे. लांजा-राजापूर विधानसभेच्या जागेसाठी काँग्रेस पक्षाकडून अनिरुध्द कांबळे यांना उमेदवारी मिळण्याची मोठी शक्यता असल्याचे बोलले जात आहे. कांबळे यांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठेने काम केले आहे. त्यामुळे लोकांमधून आता कांबळे यांना उमेदवारी मिळण्याबाबत मागणी केली जात आहे.
लांजा-राजापूर विधानसभेच्या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत केवळ अकरा हजार ८७६ मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे या मतदरसंघात काँग्रेसचे मतदार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ह्या निवडणूकीत काँग्रेसला यश मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार राजन साळवी आहेत. परंतु साळवी यांच्या विकास कामांचा आलेख पाहता मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर महायुतीकडून रिंगणात कोण उतरणार याबाबत प्रश्न कायम आहे. मात्र पहिल्यापासून काँग्रेसचा मतदार असलेल्या लांजा-राजापूर विभागात आता अनुसूचित जाती-जमाती विभागाचे तेरा वर्ष जिल्हाध्यक्ष राहिलेले काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांना उमेदवारी मिळण्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
कांबळे यांनी गेली पंचवीस ते तीस वर्ष काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक व एकनिष्ठेने काम केले आहे. पक्ष मजबुतीसाठी गाव-वाडीत गुप्त गाठीभेटी घेणे, एखाद्या आंदोलनात कार्यकर्त्यांसह सहभागी होणे, तसेच हाती घेतलेला विषय तडीस नेण्यासाठी प्रयत्न करणे एकूणच काँग्रेसमधील एकमेव रस्त्यावरील आंदोलन करणारा कार्यकर्ता अशी त्यांची लोकांमध्ये ओळख आहे. त्यांचा जिल्हाभरात असलेल्या दांडग्या संपर्कामुळे कांबळे यांच्या नावाची चर्चा होणे स्वभाविक मानले जात आहे. मात्र उमेदवार स्थानिक हवा या जोर धरणाऱ्या लोकांच्या मागणीबाबत काँग्रेस पक्षाकडून विचार केला जाणार का? असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.