(संगमेश्वर)
डिंगणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गुरववाडी या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला देताना दोनशे रुपये घेतले जात आहेत. दोनशे रुपये दिले नाही तर दाखला नाही, अशी चर्चा सुरु असून या विषयी त्वरित चौकशी करून मनमानी कारभाराला आळा घालण्यात येऊन मनमानी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
शासनाकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आली असून एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या व त्या पुढील वयांच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे शासनाच्या तिजोरीतून जमा केले जाणार आहेत. तरी या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण अर्जासोबत वयाचा पुरावा म्हणुन जन्म दाखला किंव्हा शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, बँक खाते बुक आदी ठरवण्यात आलेले कागदपत्र जोडावयाची लागणारे दाखले वा अन्य कागदपत्रासाठी महिलांना वेठीस न धरता तसेच, पैसे न घेता दाखले देण्यात यावे असे शासनाकडून कडक आदेश देण्यात आले असून लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्यास त्या कर्मचाऱ्यांची त्वरित चौकशी करून कारवाई केली जाईल असे ठणकावून सांगण्यात आले आहे.
असे असताना येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा डिंगणी गुरववाडी या शाळेत शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी दोनशे रुपयांची मागणी केली जात असून दोनशे रुपये घेतल्याशिवाय दाखला दिला जात नाही. या बाबत एका वयोवृद्ध व्यक्तीने पत्रकारांना माहिती देताना सांगितले, मी माझ्या विवाहित मुलीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी येथील शाळेत जाऊन दाखल्याची मागणी केली असता दाखल्यासाठी दोनशे रुपये द्यावे लागेल असे सांगितले. याबाबत मी पैसे कसले मागताय, दाखल्यासाठी पैसे घेण्यात यावे असे शासन परिपत्रक आहे का? असे विचारले असता कमेटीने ठरवले असे सांगितले व माझ्याकडून दोनशे रुपये घेऊनच दाखला दिला. मात्र पैसे घेतल्याची कोणतीही पावती दिली नाही असे सांगितले. तसेच अन्य काही लोकांकडून सुद्धा पैसे घेतल्याची चर्चा आहे.
शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून दाखल्यासाठी येणाऱ्यांची पैशासाठी पिळवणूक केली जात असेल तर त्याची त्वरित दखल जिल्हाधिकारी यांनी घ्यावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.