(मुंबई)
मुंबईतील भांडूप येथील रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. बाळ सारखं रडत असल्यामुळे 3 नर्सेसने बाळाच्या तोंडाला चिकपट्टी लावली. या खळबळजनक घटनेने मुंबई महानगर पालिकेने या 3 नर्सेसवर कारवाई केली आहे. तिन्ही नर्सेंसच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रिया कांबळे असं पीडित बाळाच्या आईचे नाव आहे.
२०२२ मध्ये युगंधर कांबळेसोबत लग्न झालेल्या प्रियाने २० मे २०२३ रोजी भांडुपमधील सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला होता. तीन दिवसांनंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आणि तिच्या मुलाला काही आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास परत रुग्णालयात परत येणास सांगितले. मुलाचा रंग अचानक पिवळसर झाल्याने प्रियाने २६ मे २०२३ रोजी ताबडतोब रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी तिला सांगितले की, बाळाला जोपर्यंत स्तनपान दिले जात आहे, तोपर्यंत त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. तथापि, बाळाच्या समस्या कमी न झाल्याने, बाळाला ३१ मे २०२३ रोजी एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर बाळाला डिस्चार्ज मिळाला आणि प्रियाने 2 जून 2023 रोजी बाळाला पाहिले. त्यावेळी बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावल्याचं प्रिया यांच्या निदर्शनास आलं. बाळाच्या अंगाला हनुवटीला, मानेला चिकटपट्टी लावल्याचं दिसून आले. प्रियाने सर्व चिकटपट्टी काढली. या चिकटपट्टीमुळे बाळाच्या अंगावर पुरळ देखील आली होती.
या घटनेचा जाब विचारण्यासाठी नर्सेला प्रियाने विचारलं होते परंतु त्यांनी उलट उत्तरे देऊन प्रियाशी अरेरावी केली. बाळ सतत रडत असल्यामुळे चिकटपट्टी लावली त्यात काही नवीन नाही. उगाच गोंधळ घालू नका असं उत्तर दिले. या घटनेची माहिती प्रियाने संपुर्ण कुटुंबियाना दिली. याचा जाब देखील स्थानिक नगरसेवकांनी विचारला होता. प्रियाने या घटनेची माहिती एका वकिलाला दिली. त्यांनी याबाबत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली. प्रियाच्या वकिलाने महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगकडे मदत मागितल्यानंतर अखेर २२ फेब्रुवारी रोजी पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेने या प्रकरणाची दखल घेतली. या प्रकरणी लक्ष घालत आयोगाने मुंबई महापालिका आणि पोलिसांना याबाबत समन्स पाठवलं. पोलिसांनी या समन्सची दखल घेत तीन नर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.