(रत्नागिरी)
बारा तासांहून अधिक काळ आंब्याच्या झाडावर तारेत अडकून पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तार कापून सुटका केली. त्यानंतर, बिबट्याने जंगलात धूम ठोकली. ही घटना राजापूर तालुक्यातील भालावली येथे शनिवारी दुपारी घडली. तारेत अडकलेला बिबट्या हा नर जातीचा आहे. त्याचे वय अंदाजे एक ते दीड वर्षे आहे.
भालावली येथील पांडुरंग गणेश केळकर यांच्या मालकीच्या जागेत आंब्याच्या झाडावर २० फूट अंतरावर तारेमध्ये बिबट्या अडकला होता. ही माहिती अमोल नार्वेकर यांनी राजापूर परिमंडळ वन अधिकारी यांना दूरध्वनीवरून दिली. त्यानंतर, रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांना माहिती देण्यात आली. वन अधिकारी सुतार यांच्यासह पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वरूप काळे, कोल्हापूर येथील वन्यजीव पशुवैद्यक व पशुशल्य चिकित्सक डॉ. संतोष भिकाजी नानेकर, वनपाल अमित कुंभार, तेजस कांबळे व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. तारेच्या फासकीत अडकलेला बिबट्या झाडावर सकाळपासून अडकलेल्या स्थितीत होता. फासकीत अडकल्याने त्याला हालचाल करता येत नव्हती. या अवस्थेत ट्रक्युलाईन गनचा वापर करून बिबट्याला रेस्क्यू करणे अवघड होते. पशुधन विकास अधिकारी, वन्यजीव पशुवैद्य व पशुशल्य शल्यचिकित्सक, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी बिबट्या सुस्थितीत असल्याची खात्री केली. त्यानंतर शनिवारी रात्री ९:३० वाजण्याच्या दरम्यान रेस्क्यू टीमचे शिंदे यांच्या मदतीने बिबट्या अडकलेली तार कट करण्यात आली. ही तार कट करताच बिबट्याने काही सेकंदातच जंगलात धूम ठोकली.
सकाळपासून प्रयत्न रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल जयराम बावदाणे, न्हानू गावडे, सारीक फकीर, वनरक्षक प्रभू साबणे, शर्वरी कदम, विक्रम कुंभार, श्रावणी पवार, राहुल गुंठे व रेस्क्यू टीमचे महेश धोत्रे, तांबोळी, विजय महादये, दीपक महादये, नितेश गुरव, नीलेश महादये यांनी बिबट्याची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले. सकाळपासून हे सर्व बिबट्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होते.