(देवरुख / सुरेश सप्रे)
छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स क्लब (CSSC HOCKEY) चा गुणवान हॉकी खेळाडू सौरव धाडवे याची जयपूर, राजस्थान येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेच्या पश्चिम विभागीय लीग स्पर्धेत निवड झाली आहे.
जळगावच्या कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हॉकी संघात सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. सौरवने प्रताप महाविद्यालय, जळगावचे प्रतिनिधित्व करत, आपली उत्तम खेळ कौशल्ये सिध्द केली आहेत.
लहानपणापासून CSSC देवरुखच्या संघात खेळत असलेल्या सौरवने याआधी मुंबई विद्यापीठाच्या संघात सुद्धा आपले स्थान निर्माण केले होते, जेव्हा तो ASP कॉलेज, देवरुखकडून खेळत होता. त्याने अखिल भारतीय आगाखान चषक, राज्य अजिंक्यपद स्पर्धा आणि अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सौरवच्या या यशामागे क्लबचे मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर पवार, विनोद पोळ, केतन मांडवकर आणि सुमित भुवड यांचे बहुमूल्य मार्गदर्शन आहे. सौरव धाडवेच्या उत्कृष्ट कामगिरीने रत्नागिरी जिल्ह्याची क्रीडा नगरी म्हणून ओळख असलेल्या देवरुखच्या शिरपेचात सलग तिसऱ्यांदा मानाचा तुरा रोवला आहे.
देवरुख, संगमेश्वर रत्नागिरी जिल्हा आणि संपूर्ण कोकणवासीयांनी सौरवच्या या यशाचा अभिमान व्यक्त केला असून, त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.