( देवरुख / प्रतिनिधी )
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये- सप्रे- पित्रे स्वायत्त महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या राज्यव्यापी महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘पुस्तक आपल्या दारी’ हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत देवरुख पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, देवरुख आणि नगरपंचायत देवरुख कार्यालयाला वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश संबंधित कर्मचारीवर्गाला वाचनाच्या माध्यमातून मानसिक शांती देणे आणि कामातील तणाव कमी करणे हा होता.
या उपक्रमाबाबत बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सांगितले की, “वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्रात वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणे हा असून, याच अनुषंगाने ‘पुस्तक आपल्या दारी’ हा उपक्रम राबवण्यात आला. यातून वाचनाची आवड निर्माण होऊन, वाचकांच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल होण्यास मदत होईल.” या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. अजित जाधव, ग्रंथालय सहाय्यक स्वप्नील कांगणे व रोशन गोरूले आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
फोटो : तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पुस्तक वाटप करताना उपप्राचार्य डॉ. पाटील, ग्रंथपाल प्रा. मायंगडे आणि विद्यार्थी.