राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आणि इतर लहान पक्ष महायुतीत आहेत. तर काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी लवकरच महाविकास आघाडीत सामील होऊ शकते. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखे काही पक्ष आहेत जे कोणत्याही युती किंवा आघाडीत सहभागी झालेले नाहीत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अधून मधून मनसे आणि भाजपाच्या युतीची चर्चा ऐकायला मिळते. महायुतीमध्ये राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष येणार अशा चर्चाही दबक्या आवाजात सुरू असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्षा बंगला तर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर वारी देखील केली आहे.
अलीकडच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वरचेवर राज ठाकरे यांना भेटत असतात. त्यामुळेच मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. फडणवीस एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीवेळी मनसे आणि राज ठाकरेंबरोबरच्या संबंधांवर भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आगामी काळात मनसे कुठे असेल, कोणाबरोबर असेल ते वेळच सांगेल. आमची निश्चितपणे राज ठाकरे यांच्याशी मैत्री आहे. आमच्या भेटीगाठी होत असतात. आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारतो. ते बऱ्याचदा काही चांगल्या सूचना करतात. कधीकधी आमच्यावर टीकाही करतात. परंतु, आम्ही एकत्र येऊन काम करू की नाही हे आत्ता सांगू शकत नाही. ही गोष्ट लवकरच आपल्याला संमजेल. अद्याप कोणीही त्यावर निर्णय घेतलेला नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आतापर्यंत तरी ‘एकला चलो रे’ची भूमिका ठेवली होती. दरम्यानच्या काळात त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबतही युतीच्या चर्चा होत्या. पण त्या प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र अशा चर्चा स्पष्टपणे नाकारल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना शिंदे पक्ष असो किंवा भाजप, आमच्यात संवाद सुरू आहे. त्याच अनुषंगाने आम्ही त्यांची सदिच्छा भेट घेत असतो, त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असे संदीप देशपांडे म्हणाले.