(संगमेश्वर)
मालदीव देशामध्ये 6 वी एशियन कँरम चँम्पीयन 2024 या आंतरराष्ट्रीय कँरम स्पर्धेचे आयोजन करण्या आले होते. या स्पर्धेचे यजमानपद हे मालदीव देशाला मिळाले होते. ही स्पर्धा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. सदर स्पर्धेत भारतीय संघही सहभागी झाला होता. महिलांच्या चार जणींच्या चमूत देवडे गावची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कँरमपटू आकांक्षा उदय कदम हीची संघात निवड झाली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून फक्त आकांक्षा ही एकमेव व वयाने सर्वात लहान खेळाडू सहभागी होती.
आकांक्षाने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत दोन सुवर्ण व एक ब्रांझ पदक अशी तीन पदकांची कमाई केली. ती अगदी कमी वयात संपूर्ण देशभरात नावाजलेली खेळाडू असून आकांक्षाने यापूर्वीही उंच उंच शिखरे चढून यश प्राप्त केले आहे. तीने 2019 मध्येही मालदीव देशामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कँरम स्पर्धेत वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी पदार्पणातच दोन सुवर्णपदके मिळवून विक्रम केला होता. तसेच तिने राज्यस्तरावरील ओपन गटाचे तब्बल नऊ वेळेस विजेतेपद व तीन वेळेस उपविजेतेपद मिळविले आहे. तर एक वेळ हँटरिक तिच्या नावे आहे. ज्युनिअर कँरमचे सलग तीन वर्षे विजेतेपदही तिच्या नावावर आहे.
उत्तरप्रदेश वाराणसी येथे झालेल्या कनिष्ठ राष्टीय स्पर्धेची आकांक्षा विजेती आहे.तर राष्ट्रीय शालेय स्पर्धेत आकांक्षाला एक सुवर्ण तर दोन रौप्य पदके मिळाली आहेत. 2022 मध्ये पश्चिम बंगाल मधील दुर्गापूर येथे झालेल्या नँशनल कँरम स्पर्धेची आकांक्षा विजेती असून आंध्रप्रदेश मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत एक ब्रांझपदक व दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आकांक्षाला दोन कांस्यपदके मिळाली आहेत.
तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.तीला महाराष्ट्र कँरम असोसिएशनचे श्री.अरूण केदार, यतीन ठाकूर, श्री.व सौ.भारती नारायण, रत्नागिरी कँरम असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, आंतरराष्ट्रीय कँरमपटू संदिप देवरूखकर, मामा महेश देवरूखकर, भाऊ यश कदम यांचे मार्गदर्शन लाभले.