(संगमेश्वर / एजाज पटेल)
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे बिद्र जोपासणाऱ्या परिवहन विभागाच्या बसेसचे जाळे खेड्यापाड्यांत, ग्रामीण व दुर्गम भागातही पोहोचले आहेत. एसटी बसच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे राहणाऱ्या राहणाऱ्या प्रवाशांचे उन्ह, वारा, पावसापासून संरक्षण व्हावे, त्यांची तात्पुरती सोय व्हावी म्हणून संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावांत तसेच एसटी बसेस धावणाऱ्या अनेक मार्गावर शासकीय निधीतून प्रवासी निवारे उभारण्यात आले. परंतु, योग्य देखभालीचा अभाव, नजीकच्या विक्रेत्यांचे अतिक्रमण, असामाजिक तत्वांच्या वापरामुळे हे निवारे बेवारस झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र, याकडे गाव पुढाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे सुद्धा अक्षम्य असे दुर्लक्ष होत असल्याचेच चित्र आहे .
प्रवाशांना एका गावावरून दुसऱ्या गावी जाण्यासाठी एसटी बसची नेहमीच प्रतीक्षा करावी लागते. त्यासाठी रस्त्यावर सोयीच्या ठिकाणी थांबे व निवारे उभारण्यात आले आहेत. बहुतेक प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम हे आमदार, खासदारांच्या स्थानिक निधीतून करण्यात आले आहे. परंतु, हे निवारे उभारण्याला बराच कालावधी उलटून गेला. दरम्यान यातील अनेक निवाऱ्यांची मोडतोड व दुरवस्था झाली. काही ठिकाणी शेड उडाले, फ्लोअरिंग उखडून मोठे खड्डे पडले, सिमेंटच्या बाकांची तोडतोड झाल्याची स्थिती आहे. यातील निवारे हे जनावरांचे किंवा असामाजिक तत्वांचे आश्रयस्थान सुद्धा झाले आहे. मुतारी म्हणूनही त्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे या निवाऱ्याकडे प्रवाशांना पाठ फिरवणे साहजिकच भाग पडत आहे.
अनेक बसथांबे व प्रवासी निवारे जाहिरातींचा प्रसार करणारी केंद्रे बनली आहेत. काही जण या ठिकाणी आपली जाहिरात करून मोकळा होतो. त्यामुळे या निवाऱ्यांना विद्रुप केले जाते. मळकट व रंगलेल्या भिंतीमुळे येथील कलुषित वातावरणामुळे प्रवासी निवाऱ्यांत जाण्यास कचरतात. अनेक निवाऱ्यांजवळ बोअरवेल किंवा पाण्याचीही सोय नाही. निवाऱ्याचे छत उडालेले आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीचा आधार शोधत झाडाखाली व टपऱ्यांमध्ये थांबावे लागते. प्रसाधनगृहांचीही सोय नसल्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत आहे.