(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
ग्रामीण भागात आजही लोकांना लालपरी किंवा एसटी हे एकेमव प्रवासाचे साधन आहे. परंतु मागील एक-दीड वर्षांपासून एखाद्या राजकीय नेत्याचा जिल्हा दौरा आखला गेल्यावर काहीतरी निमित्त काढून एसटीच्या अनेक फेऱ्या त्या मार्गावर वळवायचा, हा शिरस्ता झाला आहे. उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला सभेला देवरुख आगारातून तब्बल वीस गाड्या बुक करण्यात आल्याचे समजते.
सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी तास, दीड तास अगोदर घराबाहेर पडत आहेत. त्यात बसफेऱ्या रद्दच्या फलकाने विद्यार्थी आणि पालक चिंताग्रस्त झाले आहेत. ऐन परीक्षेच्या काळात एसटीचे वेळापत्रक कोलमडणार असल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांची त्रेधातिरपीट उडणार हे नक्की. मात्र याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बुक केलेल्या २० गाड्या उपमुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी जाणार असल्याचे देवरूख बसस्थानकातून सांगण्यात आले आहे. उर्वरित चाळीस गाड्या सेवेसाठी दाखल असल्या तरी त्या अपुऱ्या पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काही ना काही प्रशासकीय कामे निघाली की, एसटी सेवेला सज्ज होते. पण तीच एसटी प्रवाशांच्या सेवेकडे या निमित्ताने पाठ फिरवते, हे न लपणारे सत्य आहे. एसटीच्या फेऱ्यांचा ताळमेळ बिघडला तर त्यातून महाविद्यालयीन परीक्षार्थीचे नुकसान होणार नाही, विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचणे शक्य होईल, या पद्धतीने एसटीचे नियोजन होणे गरजेचे आहे.
परीक्षेचा कालावधी सुरू असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याची केंद्रावर लवकर पोहोचण्यासाठी धावपळ सुरू असते. विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी दरवर्षी शासन प्रशासनाकडून पुढाकार घेतला जातो. परंतु परीक्षेच्या कालावधीतच उपमुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी एसटी गाड्या वळविण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या वाटेवर अडथळा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.