(चिपळूण)
मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील बहादूरशेखनाका येथील ब्रिटिशकालीन पूल तोडण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. दोन जेसीबीच्या सहाय्याने हे तोडकाम सुरू झाले असून, ते महिनाभर सुरू राहण्याची शक्यता आहे. याकामी सव्वा कोटी खर्च अपेक्षित आहे.
बहादूरशेखनाका येथील ब्रिटिशकालीन पुलाजवळ निर्माण झालेले बेट, भराव तसेच कमी उंचीच्या पुलामुळे महापुराचे पाणी त्वरित वाहून जात नाही. २००५ तसेच २०२१ मध्ये आलेल्या महापुरात त्याचा प्रत्यय आला. त्यात हा पूल जीर्ण झाला आहे. त्याला पर्याय म्हणून महामार्गाच्या चौपदरीकरणात खूप उंचीवर नव्या पुलाची उभारणी करण्यात आली. पाणी वाहून जाण्यात अडथळा असलेला हा जुना पुल तोडण्याची मागणी चिपळूण बचाव समितीसह नागरिकांनी केली होती. मात्र त्याला काहींचा विरोध असल्याने निविदा प्रक्रिया राबवूनही हे काम रखडले होते.
महापुराच्या काळात पुलामुळे पाणी अडत असल्याचे आणि तो तोडणे गरजेचे असल्याचे मत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही मांडले होते. बचाव समितीचे पदाधिकारी प्रांताधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. अखेर या कामाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. त्यासाठी सुमारे १ कोटी २४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. याकामी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी निर्णायक भूमिका घेतली. त्यामुळे या कामाला गती आली आहे.
पुरापासून नागरिकांची मुक्तता…
चिपळूण बचाव समितीचे अरूण भोजने यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले, हा पूल तोडल्याने पुरापासून नागरिकांना बऱ्याच अंशी मुक्ती मिळेल. गाळ उपसा, पूल तोडणे, आमदार शेखर निकम यांच्या पुढाकारातून नलावडे बंधारा काम यामुळे शहरावरील पुराचा धोका टळेल.