(पुणे)
पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत उघड चौकशी करण्याचा लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचा (एसीबी) अहवाल गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी बुधवारी केली.
आल्हाट यांनी माजी पोलीस आयुक्त गुप्ता यांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जून २०२४ मध्ये तक्रार अर्ज केला होता. या प्रकरणाचा तातडीने व सखोल तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या अर्जाच्या प्रती उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) आणि शहराच्या पोलीस आयुक्तांना पाठवण्यात आल्या आहेत. गुप्ता यांच्याबरोबरच तत्कालीन चार पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर औंधमधील सावकार नाना गायकवाड याच्या घरावर छापा टाकल्यानंतर तेथील १५ कोटी रुपये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हडप केल्याचा खळबळजनक आरोप आल्हाट यांनी केला आहे.
गायकवाड याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार, बेकायदा सावकारी, तसेच जमिनी लुबाडल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहराच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात तत्कालीन पोलीस आयुक्त गुप्ता यांनी हडपसरमधील अमनोरा टाऊन पार्कतर्फे विकसित केल्या जात असलेल्या ‘स्वीट वॉटर व्हिलाज’ वसाहतीमध्ये दहा गुंठ्घांचा प्लॉट घेतला असून, तेथे कोट्यवधी रुपये खचून आलिशान बंगल्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर गुप्ता व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर सांताक्रुझ (पश्चिम) परिसरातील सुमेर रेडियस रिअल्टी प्रा. लि.च्या बांधकाम प्रकल्पामध्ये २० कोटी रुपये किमतीचा फ्लॅट आहे. मर्जीतील एका पोलीस शिपायाच्या माध्यमातून गुप्ता यांनी पुण्यातून दरमहा कोटधवधी रुपयांची माया गोळ्ळा केली, असा आरोप आल्हाट यांनी जून २०२४ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाठवलेल्या पत्रात केला आहे. तसेच गुप्ता यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली.
दरम्यान, या तक्रार अर्जावर काय कारवाई झाली? याबाबत आल्हाट यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये अर्ज केला होता. त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पत्रोत्तर दिले आहे. गुप्ता यांची चौकशी करण्याचा अर्ज गुप्त चौकशीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. गुप्त चौकशी करून गुप्ता यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याबाबतचा अहवाल १९ ऑगस्ट २०२४ ला या विभागाच्या पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आला, त्यांच्याकडून या विभागाच्या महासंचालकांना २५ ऑगस्ट २०२४ ला उघड चौकशीची परवानगी मिळण्यासाठी अहवाल पाठवण्यात आला आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आलहाट यांना पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
माजी पोलीस आयुक्त गुप्ता यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्यासाठी मंजुरी मिळण्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अहवाल गेले सहा महिने प्रलंबित असून त्यास तातडीने मंजुरी मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे, अशी माहिती आल्हाट यांनी माध्यमांना दिली.