(राजापूर)
राजापूर एसटी डेपोमध्ये असलेले एसटी कॅन्टीन मागील काही महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. आता गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने या काळात राजापूर आगारात प्रवाशांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी कॅन्टीन लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजीम जैतापकर यांनी केली आहे.
एसटी कॅन्टीनमुळे तालुक्यातून राजापुरात येणाऱ्या प्रवाशांची चहा, नाष्टा तसेच जेवणाची सोय होत होती. मात्र, काही महिन्यांपासून ही एसटी कॅन्टीन बंद करण्यात आली आहे. एसटी प्रशासनाने भाडेवाढ केल्याने संबंधित कॅन्टीन चालकाने कॅन्टीन बंद केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, एसटी कॅन्टीन बंद झाल्याने राजापूर आगारात येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. हे कॅन्टीन सुरु झाल्यास त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
गणेशोत्सवाला काही दिवसात सुरुवात होणार असून, या कालावधी राजापूर एसटी आगार गजबजणार आहे. एसटी कॅन्टीन सुरू नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी एसटी कॅन्टीन सुरू करावी, अशी मागणी जैतापकर यांनी केली आहे.