(रत्नागिरी)
जिल्हाधिकाऱ्यांकडे उदरनिर्वाह भत्ता मिळवण्यासाठी महिलेने अर्ज केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता आपल्या आईला निर्वाह भत्ता न देणाऱ्या मुलाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू उर्फ राजेंद्र विठ्ठल तळेकर (रा. फिनोलेक्स कॉलेज जवळ, मिरजोळे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित मुलाचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल दिनेश हरचकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शोभा विठ्ठल तळेकर (रा. मिरजोळे, रत्नागिरी) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे उदरनिर्वाह भत्ता मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी १४ फेब्रुवारी २०२४ ते अपिलाची तारीख लागेपर्यंत प्रति महिना ३ हजार रुपये शोभा तळेकर यांना देण्याचा आदेश मुलगा राजेंद्र तळेकरला दिला होता.
तसेच या आदेशाचा उपमर्द केल्यास तो भा.दं. वि. कायदा कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र राहील असेही त्या आदेशात नमूद करण्यात आले होते. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याबाबतचा अर्ज शोभा तळेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यामुळे राजेंद्र तळेकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.