( वैभव पवार / गणपतीपुळे )
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात शुक्रवारी त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सवाची मोठ्या भक्तीभावात व उत्साहात सांगता झाली. यावेळी संपूर्ण गणपतीपुळे गावातील स्थानिक ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावली होती तर यामध्ये अनेक भक्तगण आणि पर्यटक सहभागी झाले होते. यावेळी या भक्तगण व पर्यटकांसाठी हा दीपोत्सव खास आकर्षण ठरला.
मागील 16 ऑक्टोबर 2024 मधील आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा पासून ते दिनांक 15 नोव्हेंबर 2024 कार्तिक पौर्णिमा म्हणजेच जनत्रिपुरारी पौर्णिमा या काळात हा उत्सव मनोभावे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात संपन्न करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा चालणारा हा दिव्यांचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक वातावरणात दररोज साजरा करताना करताना संस्थान श्री देव गणपतीपुळेची संपूर्ण पंचमंडळी, मुख्य पुजारी, देवस्थानचे सर्व कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या श्रद्धे भावनेने सहभागी झाले होते. यावेळी स्वयंभू गणपती मंदिरात स्थानिकांच्या व भक्तगणांच्या उपस्थितीत रितीरिवाजानुसार दररोज सायंकाळी श्रीं ची पंचोपचार पूजा करून सात वाजता मंदिरातील सर्व विद्युत पुरवठा व रोषणाई खंडित करून फक्त तेलाच्या दिव्यांनी संपूर्ण मंदिर प्रकाशित करण्यात आले. आणि आरती मंत्रपुष्पांजली सेवा सादर करण्यात आली. यावेळी दिव्यांचा मनोहारी झगमगाट आणि लखलखाट अनुभवता आला. तद्नंतर प्रसादाचे वाटप करण्यात येऊन त्या त्या दिवसाच्या दीपोत्सवाची सांगता करण्यात आली.
सदर महिनाभर चालणाऱ्या उत्सवाची जय्यत तयारी आणि सुसूत्र नियोजन संस्थान श्री देव गणपतीपुळे यांचे मार्फत करण्यात आले होते. यामध्ये अनेक भक्तगण मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते, अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी श्री अमित प्रभाकर घनवटकर यांनी दिली. तसेच या विलोभनीय अश्या दिपोत्सव सांगता सोहळ्याला उपस्थित राहून अनेकांनी आनंद अनुभवल्याचे संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने सांगण्यात आले.
या दीपोत्सवानिमित्त संपूर्ण श्रींचे मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. तसेच मंदिर परिसरात करण्यात आलेली दिव्यांची आरास खास आकर्षण ठरली यावेळी दीपोत्सव सांगता प्रसंगी अवकाशात करण्यात आलेली आकर्षक फटाक्यांची आतषबाजी सर्वांसाठी विशेष लक्षवेधी ठरली. हा दिपोत्सव साजरा करण्यासाठी गणपतीपुळे देवस्थानचे पंच मंडळी, सर्व कर्मचारी, मुख्य पुजारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी मोठी मेहनत घेतली.