( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी येथील औद्योगिक कारणांसाठी भूसंपादित करण्यात आलेल्या जमिनीमध्ये येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी असून याबाबत रत्नागिरी येथील उपविभागीय अधिकारी यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र भूसंपादित शेतकऱ्यांनी भू संपादित नोटीसीला आक्षेप नोंदवलेला आहे.
या आक्षेपात रत्नागिरी उपविभागीय अधिकारी यांच्या आदेश पत्रान्वये म्हटले आहे की, प्रस्तावित उद्योग क्षेत्रामध्ये फळ प्रक्रिया व इतर अनुषंगिक उद्योगधंदे येणार आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याला बाधा पोहचणार नाही याची जबाबदारी अभियांत्रिकी विभाग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत यांची राहिली असल्याचे कळविले आहे. तसेच ज्या खातेदारांचे क्षेत्र संपादन होणार आहे त्यांना प्राधान्य प्रमाणपत्र मंडळाच्या नियमाप्रमाणे देण्यात येणार असल्याचे कळविले होते. परंतु औद्योगिक विकास महामंडळाकडे निवेंडी येथील स्थानिक शेतकरी चौकशीसाठी गेले असता त्यांना याबाबत कल्पना नसल्याचे तसेच सदर प्रकल्पाबाबतबाबत कोणतीही माहिती व्यवस्थितरित्या देत नसल्याने शेतकऱ्यांमधला संयम संपला आहे. तसेच आमची फसवणूक होत आहे तसेच एमआयडीसीचे अधिकारी महसूल विभागात प्रलंबित म्हणत आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना शेत जमिनीचा योग्य मोबदला कोणत्या दराने अदा करण्यात येणार आहे तसेच येथील शेतकऱ्यांना शासनाकडून प्रकल्प बाधित दाखला देणे तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रकल्पांमध्ये नोकरीसाठी समाविष्ट करून घेण्यात यावे, या मागणीवरती विशेष लक्ष न दिल्यास दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर निवेंडीतील स्थानिक ग्रामस्थ सर्वजण एकमताने बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतचे लेखी निवेदन रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना लेखी स्वरूपात देण्यात आले आहे. तसेच संबंधित निवेदनाची प्रत अधिक माहितीसाठी रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी आणि प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी रत्नागिरी यांना देण्यात आली आहे. या निवेदनावर निवेंडी येथील सुमारे 100 भूसंपादित शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. तसेच या सर्वांनी आपल्याला योग्य न्याय न मिळाल्याने एकमताने विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांना त्यामुळे आता संबंधित भूसंपादित शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकारी कोणती भूमिका घेणाऱ् याकडे निवेंडी परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.