(रायगड)
सध्या राज्यभर पावसाने जोर धरला असल्याने अनेक धबधबे व धरणे ओसंडून वाहत आहेत. यामुळे नागरिक वर्षा पर्यटनासाठी धबधब्यांवर गर्दी करताना दिसत आहेत. मात्रसहलीचा आनंद लुटताना दाखवलेला अतिउत्साह अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे.अतिउत्साही पर्यटक आपल्या जीवाची पर्वा न करता धोकादायक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात आणि अशातच आपला जीव गमावतात. असाच प्रसंग रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कुंभे धबधबा येथे घडला आहे. कुंभे येथे पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील तरुणीचा इन्स्टाग्रामसाठी रिल बनवताना दरीत पडून मृत्यू झाला आहे.
अन्वीला प्रवासाची आवड होती व या आवडीला तिने आपले करिअर बनवले होते. बुधवारी रायगडमधील कुंभे धबधब्याचे सौंदर्य कॅमेऱ्यात टिपत असताना अन्वीचा अपघात व त्यात तिचा मृत्यू झाला. अन्वी धबधब्याच्या बाजूला असलेल्या एका छोट्या सुळक्यावरती जाऊन रील शूट करत होती. त्याचवेळी व्हिडीओ काढण्याच्या नादात तिचा पाय निसटला व ती थेट 350 फूट खोल दरीमध्ये पडली.
तिच्यासोबत असलेल्या मित्रांनी याची माहिती माणगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी याची माहिती जवळच्या सर्व रेस्क्यू टीमला दिली.कोलाड, माणगाव, महाड येथून प्रशिक्षीत बचाव पथकांना पाचारण करण्यात आले.याची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड या टीने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुपारी साडे बारा वाजल्यापासून बचाव कार्य सुरू करण्यात आले. पावसामुळे दरीत उतरणे मोठे आव्हानात्मक काम होते.दोरीच्या साह्याने ही बचाव पथके दरीत उतरली. १५ मिनिटात टीम तरुणीच्या जवळ पोहोचली. तिला जखमी अवस्थेमध्ये माणगाव तालुका शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अन्वी कामदारचे इंस्टाग्रामवर दोन लाख 54 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. अन्वीने सीएचे शिक्षण घेतले होते आणि काही काळ डेलॉइट नावाच्या कंपनीत कामही केले होते. मुंबईत राहणारी अन्वी कामदार पावसाळ्यात कुंभे धबधब्याच्या शूटिंगसाठी आली होती.