(संगमेश्वर)
भूमी अभिलेख देवरुख यांनी जमिनीचे खोटे नकाशे वापरून चुकीच्या पद्धतीने हायवेच्या नकाशात दुरुस्ती केली होती व त्यासाठी खोटे नकाशे बनवण्यात आले होते. गेली दोन वर्षे पाठपुरावा करून कोणतीही कारवाई होत नसल्याने मकरंद सुर्वे यांनी 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचे ठरवले होते. त्यावर उपाधीक्षक देवरुख श्री भागवत यांनी कागदपत्रांची पडताळणी करून वस्तुस्थितीची दखल घेत महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 258 अन्वये भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालय रत्नागिरी यांच्याकडे तात्काळ अहवाल सादर केला आहे.
15 ऑगस्ट रोजी श्री भागवत यांनी मकरंद सुर्वे यांच्यासमोर सदरचा अहवाल अधीक्षक भूमि अभिलेख यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसेच अधीक्षक भूमि अभिलेख रत्नागिरी यांच्याकडून सदर अहवालावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन व दुरुस्ती करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच याबाबत उपअधीक्षक भूमि अभिलेख भागवत सदर विषयांमध्ये स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे.
उपअधीक्षक भूमि अभिलेख देवरुख यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर व सकारात्मक भूमिकेमुळे मकरंद सुर्वे यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले आहे. सकारात्मक कार्यवाही केल्याबद्दल मकरंद सुर्वे यांनी अधीक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी व उपाध्यक्ष भूमि अभिलेख देवरुख यांचे आभार मानले आहेत. योग्य कार्यवाही पुढील पंधरा ते वीस दिवसात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. परंतु योग्य कार्यवाही न झाल्यास आपण पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग पत्करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र सद्यस्थितीला या सकारात्मक भूमिकेमुळे माझे आंदोलन मी स्थगित करत आहे, असे मकरंद सुर्वे यांनी सांगितले.