(नागपूर)
नागपूरमधून एक धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एकाच घरात 3 जणांचे मृतदेह आढळले आहेत. नागपूर जिल्ह्यातील शांतीनगर तुमान गावात हे 3 संशयास्पद मृतदेह आढळून आले आहेत. मृतांमध्ये एकाच कुटूंबातील पती, पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. त्यामुळं ही हत्या आहे की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. शांतीनगर तुमान गावात इळपुंगटी हे कुटुंबीय राहत होतं. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, इळपुंगटी कुटुंबाचा राईस मिलचा व्यवसाय आहे. गुरुवारी सकाळी बराच वेळ झाला घरातील सदस्य काही बाहेर येत नव्हते. त्यामुळे शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता सगळेच हादरले. घरात तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत.
पती श्रीनिवास इळपुंगटी (वय 58 वर्षे),पत्नी पद्मालता इळपुंगटी (वय 54) आणि मुलगा वेंकट इळपुंगटी (वय 29) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. श्रीनिवास यांचा मृतदेड बेडरुममध्ये आढळून आला आहे. तर पत्नी पद्मालता आणि मुलगा वेंकटचा मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळून आला आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. या तिघांनी आत्महत्या केली कि त्यांची कोणी हत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली की त्यांचा कुणी खून केला, याचा तपास पोलीस करत आहेत.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1