(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील जयगड येथे जेएसडब्ल्यू पोर्ट आहे. कंपनीच्या माध्यमातून खाडीमध्ये मोठया प्रमाणावर ड्रेजींग करत असल्याने जयगड किल्ल्याच्या मुख्य बुरुजासह तटाबंदीना तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. कंपनीचे नवीन जेट्ठीचे काम त्वरित थांबवण्यात यावे, ग्रामस्थांच्या या मागणीला धुडकावत कंपनीचे ड्रेजींग सुरूच आहे.
महाराष्ट्राला किल्ल्याची भूमी म्हटले जाते. सुमारे ३०० हुन अधिक किल्ले असलेल्या महाराष्ट्राला इतिहासाचा प्रगल्भ वारसा लाभलेला आहे. यांत छत्रपती शिवरायांची जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, पन्हाळगड, रामशेज किल्ला आणि अनेक किल्ल्यांनी हि भूमी पावन झाली आहे. हे किल्ले म्हणजे केवळ इतिहासाचा वारसाच नाही तर शिल्पकला आणि स्थापत्यकलेचा देखील उत्कृष्ट नमुना सादर करतात. रत्नागिरी जिल्ह्यातील असाच एक किल्ला म्हणजे ‘जयगड’. सध्या या किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
इतिहासाची साक्ष देणारे रत्नागिरी तालुक्यात एकूण तीन किल्ले आहेत. पूर्णगड, रत्नदुर्ग, आणि जयगड असे हे किल्ले आहेत.
काही दिवसापासून जयगड खाडीमध्ये जे एस डब्ल्यू पोर्ट खूप मोठ्या प्रमाणात ड्रेजिंग करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या ड्रेजिंगच्या कंपनामुळे जयगड खाडीलगत असलेल्या जयगड किल्ल्याच्या बुरुज आणि तटाना तडे जात असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय पुरातत्व अधिकाऱ्यांना वेळो-वेळी सूचना करून सुद्धा अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जयगड किल्ल्याचे अस्तित्व संपल्यानंतर पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का? असा संतप्त सवाल जयगड ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
जहाजे सुरक्षित यावीत म्हणून दिवस-रात्र ड्रेजिंग….
ड्रेजिंगच्या संदर्भात जेव्हा जे एस डब्ल्यू पोर्टचे पी.आर.ओ. यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सांगितले की, महारष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या बरोबर आमचा पन्नास वर्षांचा करार झाला आहे. बंदराच्या वाढीव कामासाठी जे. एस. डब्ल्यू.पोर्ट यांना भरभरून सवलती देण्यात आलेल्या आहेत. जे. एस. डब्ल्यू कंपनीची मालवाहू जहाजे सुरक्षित पोर्टमध्ये यावीत म्हणून दिवस रात्र मोठ्या प्रमाणात ड्रेजिंग करत आहोत, असे सांगण्यात येते.
नवीन जेट्ठीचे काम त्वरित थांबवण्यात यावे
जे एस डब्ल्यू पोर्ट यांच्या खाडीच्या मुखाजवळ भराव आणि रात्रं दिवस चालणाऱ्या ड्रेजींगमुळे जयगड खाडीला पुराचा धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तसेच जयगड किल्ल्याची पडझड होऊन किल्ला नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. तो किल्ला वाचावा यासाठी काही जयगड गावातील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्या सौ. देवियानी देविदास खाडे आणि जयगड खाडी बचाव कृती समितीच्यावतीने मा.जिल्हाधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांना ड्रेजींगचे व सुरू असणाऱ्या नवीन जेट्ठीचे काम त्वरित थांबवण्यात यावे असे पत्र देखील देण्यात आले होते. परंतु सध्यस्थितीत किल्ल्याला तडे गेलेत, आगामी काळात बुरुज ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने संबधित विभागाने या घटनेची दखल घेऊन ड्रेजींगचे व सुरू असलेले नवीन जेट्ठीचे काम त्वरित थांबवणे आवश्यक आहे.
….तर याला जबाबदार कोण?
जे एस डब्ल्यू पोर्ट यांच्या वाढीव बंदरासाठी व्यवसाय वाढीसाठी जयगड खाडीच्या मुखावर भराव टाकल्यामुळे खाडीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. आणि पाण्याचा प्रवाह बदलून परकोट किल्ल्यामध्ये घुसून किल्ल्याची तटबंदी तुटली आहे. त्याचबरोबर आता जयगड खाडी मधील रात्रं दिवस ड्रेजींगच्या कंपनामुळे जर जयगड किल्ला पडला तर याला जबाबदार कोण जिल्हाधिकारी, पुरातत्व खाते, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड की जे. एस. डब्ल्यू. पोर्ट, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.