(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे नजीकच्या भंडारपुळे मार्गावर सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असून या मार्गावर असलेल्या भंडारपुळे गाववासियांना सध्या मोठ्या प्रमाणात धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कारणाने सर्व स्थानिक ग्रामस्थ आणि या मार्गावरून ये-जा करणारे सर्वच लहान मोठे वाहन चालक मोठ्या प्रमाणात संतप्त झाले आहेत.
भंडारपुळे मार्गावर गेल्या पंधरा दिवसापासून या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. परंतु संबंधित रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून बेजबाबदारपणा दाखवला जात असल्याचे मत व्यक्त होत आहे. या रस्त्याची पूर्णतः खोदाई करण्यात आली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण रस्त्यावर माती असल्यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती असल्याने धुळीच्या साम्राज्याचा मोठा त्रास स्थानिक भंडारपुळेवासियांना आणि ये जा करणाऱ्या वाहन चालकांना सहन करावा लागला आहे.
त्यातच मार्गाचे विशेष म्हणजे या मार्गावरून समोर गणपतीपुळेचा अथांग पसरलेला समुद्रकिनारा आणि विलोभनीय निसर्ग सौंदर्य सर्वच पर्यटकांना भुरळ पाडते. तसेच या मार्गावर निसर्गरम्य ठिकाण असल्याकारणाने स्थानिक भंडारपुळेवासिय लोकांचे लहान मोठे व्यवसाय आहेत. मात्र सध्या रस्त्याच्या कामामुळे व्यवसाय बंद झाल्याने रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कामामुळे संबंधित व्यवसायिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत असल्याने आपले व्यवसाय बंद करावे लागले आहेत.
याबाबत संबंधित खात्याकडून विचारविनिमय होणे गरजेचे होते. तसेच पर्यायी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे होते, मात्र तसा कुठल्याही प्रकारे प्रयत्न केला गेला नाही. त्यामुळे स्थानिक भंडारपुळेवासीय आक्रमक झाले आहेत. एकूणच याबाबतीत ठेकेदाराचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे. येथील संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात माती असल्यामुळे सध्या अपघाताचा धोका निर्माण झाला असून एखादा मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्याच्या कामामुळे सर्वच वाहन चालक संतप्त झाले असून संबंधित बांधकाम विभागाच्या आणि ठेकेदाराच्या बेजबाबदार कामाविरोधात ग्रामस्थ एकवटले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.