(गुहागर)
तालुक्यातील पाटपन्हाळे श्रृंगारतळी येथे राहणारे जालिंदर सीताराम जाधव हे बाहेरगावी केले असताना अज्ञात चोरट्याने रोख रक्कम आणि दागिने मिळून एक लाख ८६ हजारांवर डल्ला मारला आहे. गुहागर पोलिस स्थानकात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली आहे. २१ ते ३१ डिसेंबर यादरम्यान हा प्रकार झाला आहे.
पाटपन्हाळे येथे राहणारे जालिंदर जाधव हे कामानिमित्त आपल्या मूळ गावी नाशिक सातपूर सावरकरनगर येथे गेले होते. २१ ते ३१ डिसेंबर या काळात घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी व लाकडी कपाटांचे कुलूप उचकटून ५० हजारांची रोख रक्कम आणि एक लाख १९ हजार रुपयांचे दागिने, १७ हजार ५०० रुपयांचे चांदीचे दागिने, असा एकूण एक लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरला, असे जाधव यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी गुहागर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सुरू आहे.