(मंडणगड)
दापोलीहून मुंबईच्या दिशेने निघालेली दाभोळ – मुंबई एसटी बस रस्ता सोडून १५ फूट खाली घसरून पलटी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री मंडणगड ते म्हाप्रळ मार्गावरील शेनाळे घाटात घडली. सुदैवाने ही बस झाडाला अडकल्याने रस्त्याशेजारील चिंचाळी धरणात कोसळता कोसळता वाचली. त्यामुळे बसमधील ४१ प्रवाशांचे प्राण वाचले.
बसचालक व्ही. एस. गावडे हे दाभोळ – मुंबई बस (एमएच १४, बीटी २२६५) घेऊन निघाले होते. या बसमध्ये वाहक मंदार भोईर यांच्यासह ४१ प्रवासी होते. ही बस मंडणगड येथून निघाली असता, मध्यरात्री १:५५ च्या दरम्यान चिंचाळी धरणानजीक आली असता बसने रस्ता सोडला आणि १५ फूट बाजूला उलटली. सुदैवाने त्याचठिकाणी असणाऱ्या झाडाला बस अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या अपघातादरम्यान चौक (ता. खालापूर, जि. रायगड) येथील मनोज थोरवे व त्यांचे सहकारी प्रवास करत होते. त्यांनी अपघात पाहिला आणि ते मदतीसाठी थांबले. तसेच मंडणगड येथील सचिन चव्हाण व गोठे गावातील जितेंद्र दवंडे हे एका रुग्णाला घेऊन या मार्गाने मुंबईला जात होते. चव्हाण यांनी थांबून गाडीत चढून प्रवाशांना बाहेर काढले. गाडीतील काही तरुण प्रवाशांनीही त्यांना मदत केली. त्याचबरोबर नगरसेवक मुश्ताक दाभीळकर यांनीही मदत करून जखमींना बाहेर काढले.
या अपघाताची माहिती मिळताच मंडणगडचे पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय धुपकर, पोलिस हवालदार गणेश चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल सुहास मांडवकर, विशाल कोळथरकर, महेंद्र तांदळे, आकाराम माने यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेने मंडणगड ग्रामीण रुग्णालयात आणून प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.
यंत्रणांचे फोन का बंद?
या अपघाताची माहिती देण्याकरिता नागरिकांनी मंडणगड तहसील कार्यालय, पोलिस स्थानक व दवाखान्यात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तिन्ही ठिकाणचे फोन बंद होते. त्यामुळे आपत्तीच्या काळात नेमका संपर्क कोठे साधायचा, असा प्रश्न केला जात आहे.