(चिपळूण)
शहरातील पेठमाप परिसरात भर वस्तीत मकबूल कोंडविलकर यांच्या घरासमोर मगर घुसल्याने एकच धावपळ उडाली. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर तत्काळ वन विभागाचे अधिकारी तेथे दाखल झाले व त्यांनी मगरीला पिंजऱ्यात पकडून नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. महिन्याभरात भरवस्तीत मगर घुसण्याचा हा तिसरा प्रकार आहे.
चिपळूण शहरातील शिवनदी व वाशिष्ठी नदीत तसेच परिसरातील तलावामध्येही मगरींचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु या जिवंत – मगरी आता थेट वस्ती आणि – घरामध्येही घुसत आहेत. वन विभाग – कार्यालय शहरातच असल्याने पुढील कार्यवाही तातडीने होते. परंतु भीतीचे वातावरण सतत कायम राहिले आहे.
गुरुवारी सकाळी शहरातील पेठमाप येथील भरवस्तीत मकबूल कोंडविलकर यांच्या घरासमोरच भली मोठी मगर जबडा उघडून भक्ष्याच्या शोधत असल्याचे निदर्शनास आले आणि एकच धावपळ उडाली. संपूर्ण परिसरात भीतीने गाळण उडाली.
नागरिकांनी तत्काळ यासंदर्भात येथील वन विभागाला माहिती दिली. परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर यांनी तत्काळ दखल घेत पिंजरा घेऊन अधिकाऱ्यांना रवाना केले व अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही पूर्ण केली.