(मुंबई)
मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत १२२ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने (RBI) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लावत बँकेला १३ फेब्रुवारीपासून कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. तसेच ग्राहकांनाही पैसे जमा किंवा काढता येणार नाही, असे आदेश दिले. बँकेतील सर्व प्रकारच्या अत्यावश्यक कामावरही पुढील सहा महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. यानंतर आता गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन महाव्यवस्थापक व लेखा विभागाचा प्रमुख हितेश मेहता यांच्याविरोधात दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांनी केलेल्या तक्रारीवरून शनिवारी पहाटे दादर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. हितेश मेहता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने व त्याच्या साथीदारांनी फौजदारी कट रचून त्याच्या ताब्यात देण्यात आलेल्या प्रभादेवी व गोरेगाव शाखेतील तिजोरीमधील १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या घोटाळ्यात हितेश मेहता यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पोलीस तपास करत असून, हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या देशभरात २६ शाखा असून ज्यामध्ये लाखो खातेदारांचे पैसे जमा आहेत. अशा परिस्थितीत अनेकांचे अडकलेले पैसे काढण्यासाठी पुण्यापासून पालघरपर्यंत बँकांबाहेर लांब रांगा लागल्या आहेत.
आरबीआयने बँकेवर निर्बंध लावल्यानंतर म्हटले की, “बँकेच्या ग्राहकांनी जे पैसे जमा केले आहेत त्यांना डिपॉजिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनमधून पाच लाखांपर्यंतची रक्कम मिळू शकते. मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम मिळू शकणार नाही. यासाठी बँकेच्या ग्राहकांना अर्ज करावा लागेल आणि सगळी तपासणी पूर्ण झाल्यानंतरच पैसे मिळतील. मात्र बँकेच्या ग्राहकांचे नुकसान होणार नाही”, असे म्हटले आहे.