(रत्नागिरी)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठांतर्गत रत्नागिरी शिरगांव येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविकाच्या तृतीय वर्षातील सत्र-५ मधील विद्यार्थ्यांनी मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान या विषया अंतर्गत कार्यानुभव कार्यक्रमा मध्ये मासळीच्या खिम्यापासून ‘फिश पॉकेट’ या नावीन्यपूर्ण मूल्यवर्धित स्नॅक्स पदार्थाची निर्मिती केली.
फिश पॉकेट हा नवीन मूल्यवर्धित पदार्थ तयार करताना विद्यार्थ्यांनी सौंदाळा, ह्या बाजारा मधे कमी किमतीत मिळणाऱ्या माश्याची निवड करून, त्यापासून मांस वेगळे करून घेतले. त्या मांसाबरोबर विविध साहित्य आणि मसाले वापरून, तयार केलेले चविष्ट मिश्रण समोसा पट्टीमधे भरून चौकोनी आकाराचे ‘फिश पॉकेट’ तयार केले. तेलामध्ये तळलेले हे कुरकुरीत ‘फिश पॉकेट’ अत्यंत चविष्ट, खमंग, रुचकर लागतात आणि अल्पोपहार किंवा नाष्टा म्हणून हा पदार्थ उत्तम आहे.
माश्यापासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याच्या या कार्यानुभव कार्यक्रमामधे कु. श्रावणी बाणे, वेदांती शिर्के, मोसमी कोयंडे, सुमय्या फडनाईक, अर्चीता पाटील, कृतज्ञता पाटील, जान्हवी कदम, व कु. ओंकार कांबळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच त्यांना या पदार्थाच्या निर्मिती साठी प्राचार्य डॉ. आशिष मोहिते व सहाय्यक प्राध्यापक श्री. तौसिफ काझी यांचे मार्गदर्शन लाभले.