(मुंबई)
नवी मुंबईत ऑनलाईन ग्राहक मिळवून लॉजमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली आहे. एका साईटच्या माध्यमातून नवी मुंबईत ऑनलाईन वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शिरवणे एमआयडीसी मधील राज ईन लॉजमध्ये हा प्रकार चालत होता. त्याची माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सापळा रचून कारवाई केली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या पथकाने बनावट ग्राहक तयार केले होते. या ग्राहकाने दलालाला ऑनलाईन संपर्क साधला असता त्याने ग्राहकाला महिलांचे फोटो पाठवले होते. त्यानंतर ग्राहकाला शिरवणे एमआयडीसी मधील राज ईन लॉजमध्ये बोलवण्यात आले होते. काही वेळानंतर दलाल त्याठिकाणी महिलांना घेऊन आला होता. यावेळी लॉजबाहेर सापळा रचून बसलेल्या पथकाने छापा टाकला. त्यामध्ये दलालाने शिरवणे गावातील इमारतीमध्ये इतरही महिला लपवून ठेवल्या असल्याचे समोर आले. यामुळे त्याठिकाणी देखील छापा टाकला असून एकूण ११ महिला मिळून आल्या. दलालामार्फत त्यांना देहविक्री करायला लावले जात होते.
या महिलांची सुटका करून किशोर साव, सुरेंद्र यादव, साहिल मंडल व पुरुषोत्तम शेट्टी यांच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.