(लांजा)
२५ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये भरून बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात लांजा येथील एका किराणा व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद वरेंद्र प्रदीप सुर्वे (३९, रा. फ्लॅट नंबर ३२, सातवा माळा बिल्डिंग एम-१, को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कशिश पार्क, एल. बी. एस. मार्ग, ठाणे पश्चिम ) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारीनुसार लांजा येथे एका किराणा व्यावसायिकाने दि. १५ जून रोजी सकाळी ९.०२ ते ९.०६ या कालावधीत लांजा येथील सारस्वत बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये पाचशे रुपयांच्या ५१ नोटा अशा एकूण २५ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जमा करून बँकेची आर्थिक फसवणूक केली होती.
अशा प्रकारच्या बनावट नोटा असल्याची जाणीव असतानाही त्या स्वतःकडे बाळगून आणि बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये नकली नोटांचा वापर केला म्हणून त्याच्या विरोधात लांजा पोलिस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४८९ (ब), ४८९ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १६ आणि १७ अशी दोन दिवस बँकेला सुट्टी असल्याने असल्याने मंगळवारी १८ जून रोजी लांजा पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे हे करत आहेत.