(ठाणे)
2021 मध्ये चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी, ठाणे येथील न्यायालयाने पीडित व इतर साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश डी.एस. देशमुख यांनी बुधवारी दिलेल्या आदेशात ठाण्यातील दिवा परिसरातील एका गावात राहणारा आरोपी पांडुरंग शेलार (४७) यालाही ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम पीडितेला भरपाई म्हणून देण्याचे आणि कायद्यातील तरतुदींनुसार अतिरिक्त नुकसान भरपाईसाठी प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे (DLSA) पाठवण्याचे निर्देशही न्यायाधीशांनी दिले.
न्यायालयात फिर्यादीला सहकार्य करणारे पोलीस हवालदार विद्यासागर कोळी यांनी सांगितले की, या खटल्यात फिर्यादी पक्षाच्या सहा साक्षीदार तपासण्यात आले. ते म्हणाले की, आता 6 वर्षांच्या पीडितेने देखील आरोपीला ओळखले आणि सर्व वाजवी संशयाच्या पलीकडे केस सिद्ध करण्यास मदत केली, परिणामी आरोपीला शिक्षा झाली.
ठाण्यातील म्हातार्डी परिसरात राहणारी साडेचार वर्षीय मुलगी ८ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास पांडुरंग शेलार याच्याकडे खेळण्यासाठी गेली होती. तिथे शेलारने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याची कुठे वाच्यता करू नकोस असे सांगून त्याने तिल १० रुपये दिले होते. मात्र मुलीच्या पालकांना ही बाब समजताच त्यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी शेलारला १० जानेवारी २०२१ रोजी अटक केली.
या खटल्याची सुनावणी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी ठाणे न्यायालयात झाली. सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी न्यायालयात भक्कम साक्षी पुरावे सादर करून जोरदार युक्तिवाद केला. विशेष सरकारी वकील संध्या एच. म्हात्रे यांनी न्यायालयात सांगितले की, पीडित मुलगी आणि आरोपी शेजारी होते. फिर्यादीने सांगितले की, 8 जानेवारी 2021 रोजी आरोपीने घराबाहेर खेळत असलेल्या पीडितेला आमिष दाखवून आपल्या घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला होता.